Tue, Apr 23, 2019 22:33होमपेज › Solapur › सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर

सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर

Published On: Jul 27 2018 11:47PM | Last Updated: Jul 27 2018 11:09PMसोलापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाबाबत अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे. आरक्षणाच्या न्याय हक्‍कासाठी मराठा समाजबांधवांचा लोकशाहीमार्गाने आंदोलनाचा भाग चालू आहे. मात्र यात काही सोशल मीडियाबहाद्दर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशांवर पोलिसांची, सायबर क्राईमची करडी नजर आहे.

शहर-जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने, मोर्चे निघत आहेत. त्यामुळे काही समाजकंटक फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमांतून जातीय तेढ निर्माण करणारे, एकमेकांच्या धार्मिक भावना  भडकावणारे पोस्ट करीत आहेत, त्यास लाईक्स करीत आहेत, शेअर करीत आहेत. 

मात्र असे कृत्य गुन्हेगारी स्वरुपाचे असल्याचे पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी सांगितले. जातीय तणाव निर्माण करण्याच्या उद्देशाने मेसेज शेअर करणे, लाईक्स अशा पोस्ट करणार्‍यांविरुद्ध भारतीय दंड विधान कलमान्वये 505 (1), (ग), 505 (2), 295 (क)सह माहिती-तंत्रज्ञान अधिनियम 2008 अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामध्ये तीन वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते. 

शहरात मराठा समाजाच्यावतीने  आरक्षणासंदर्भात आंदोलने चालू आहेत. यावर जातीय तेढ निर्माण करणारे  पोस्ट  टाकू नयेत, त्या शेअर करु नयेत, लाईक  करु नयेत, असे आवाहन पोलिस आयुक्‍तालयाच्यावतीने करण्यात येत आहे. जेणेकरुन सोलापूर शहरातील सामाजिक व धार्मिक सलोखा अबाधित राहील. याची दक्ष नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे. शहरातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ देऊ नये, असे सोलापूर शहर पोलिस दलाच्यावतीने शहरातील समस्त नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपला येऊ शकतात मर्यादा 

तक्रार आल्यानंतर, कोणी निदर्शनास आणून दिले की फेसबुकवरील गुन्ह्याची शहानिशा, तपास लगेच करता येऊ शकतो. मात्र  व्हॉट्सअ‍ॅपवर झालेल्या गुन्ह्याचा तपास लावण्यास मर्यादा पडत आहेत. मात्र सायबर क्राईम यावर काम करीत आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा डाटा उपलब्ध होत नाही. 

त्याठिकाणी टाकलेली पोस्ट वेळेआधी डिलिट केली की तेथेच तपास थांबतो. तरीही सायबर क्राईम शाखा यावर विशेष काम करीत आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होणार्‍या, धार्मिक भावना भडकावणार्‍या पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपवर पडताच त्या ग्रुप अ‍ॅडमिनने, सदस्यांनी ती पोस्ट डिलिट करावी, समज द्यावी अन्यथा अ‍ॅडमिनवरसुद्धा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे अ‍ॅडमिन आणि इतर सदस्यांवर याची जबाबदारी असल्याचे सायबर क्राईमच्या पोलिस उपनिरीक्षक मधुरा भास्कर यांनी दै. ‘पुढारी’ शी बोलताना सांगितले. 

अशा प्रकरणात कोणाची तक्रार आली अथवा कोणी निदर्शनास आणून दिले की त्यावर कारवाई करुन त्या सोशल मीडिया बहाद्दरावर लगेच कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी सामाजिक तेढ निर्माण करणार्‍या  पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत.
- सूर्यकांत पाटील 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा