Wed, Jan 16, 2019 19:46होमपेज › Solapur › पोलिस बंदोबस्तात दूध वाहतूक सुरू (Video)

पोलिस बंदोबस्तात दूध वाहतूक सुरू (Video)

Published On: Jul 17 2018 11:45PM | Last Updated: Jul 17 2018 11:46PMपंढरपूर :  प्रतिनिधी

दुसऱ्या दिवशीही राज्यभरात दूध दराचे आंदोलन सुरूच राहिल्यामुळे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी या आंदोलनास हिंसक वळण मिळाल्यानंतर पंढरपूर  येथे पोलिस बंदोबस्तात दूध वाहतूकसुरू करण्यात आली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनास सोलापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी तालुक्यातील दूध संकलन केंद्रे बंद राहिली आहेत. शेतकऱ्यांनी दूध संघांना न देता घरीच त्याचा वापर केला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी दुधाचे विविध पदार्थ करून दुधाची विल्हेवाट लावली. अनेकांनी पिकांना दूध सोडले तर काही शेतकऱ्यांनी शेत तळ्यात दूध ओतून दिले. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील दूध संकलन आणि वाहतूक ठप्प झाली आहे. तालुक्यातील काही गावात राज्य सरकार चा निषेध करण्यात आला. पटवर्धन कुरोली येथे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. बोंडले ( ता.माळशिरस ) येथे शिवामृत दूध संघाची दूध वाहतूक अडवूनप दुधाच्या पिशव्या भरलेले कॅरेट आणि त्यातील पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या.

पंढरपूर येथे सध्या आषाढी यात्रेसाठी 2 लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे दुधाची मागणी वाढली आहे. जिल्हा दूध संघाचे येथील केंद्रावरील दूध संकलन पूर्णपणे ठप्प आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता शिवामृत दूध संघाच्या वाहनांचा ताफा पोलिस बंदोबस्तात आणण्यात आला. 

जिल्ह्यात पालख्यांचे आगमन झाले असून दुधाची मागणी वाढते आहे अशा परिस्थितीत दूध दर आंदोलन किती ताणले जाणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.