Thu, Aug 22, 2019 12:42होमपेज › Solapur › ‘त्या’ पोलिसांवर कारवाई करा; अन्यथा राज्यभर मोर्चे

‘त्या’ पोलिसांवर कारवाई करा; अन्यथा राज्यभर मोर्चे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

टेंभुर्णी : प्रतिनिधी

संतोष बोडरे या युवकास  केलेल्या मारहाणीस जबाबदार असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दहा दिवसांत निलंबनाची कारवाई करावी अन्यथा मुख्यमंत्र्यांना याबाबत साकडे घालू. त्यांनीही दखल घेतली नाही तर या शासनाविरोधात एकाच दिवशी दीड कोटी रामोशी समाजाच्यावतीने राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांवर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलतराव शितोळे यांनी दिला.

बुधवारी अकलूज चौकातून रामोशी, बेरड, बेडर समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, लढवय्या समाजावर केलेला अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. संतोष बोडरे याच्या अंगावर वळ आहेत. मणक्यावर सूज आहे. दीड तास त्यास पोलिस बडवत होते. तरीही पोलिस खात्याची माणसे म्हणून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला तर तो सहन केला जाणार नाही.

यावेळी बबनराव खुणे, रामदास घनवटे, युवराज वजाळे, सुजाता जाधव, निवृत्त न्यायाधीश जयवंत खोमणे, जिल्हाध्यक्ष मेजर अंकुश चव्हाण, नामदेव मंडले, प्रदेश कार्याध्यक्ष संजय जाधव, सुनील अवघडे यांचीही भाषणे झाली. नाना मदने, राजाबाई बोडरे, सुरेश बोडरे, भारत जाधव उपस्थित होते.

निवेदन बार्शी उपविभागीय अधिकारी विजय कबाडे यांनी स्वीकारले. यावेळी करमाळा विभागाचे विभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी, अकलूज विभागाचे विभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, पाच पोलिस उपनिरीक्षक, 40 पोलिस कर्मचारी असा  मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.