Sun, Apr 21, 2019 00:38होमपेज › Solapur › टेंभुर्णी येथे तरुणास पोलिसांकडून मारहाण

टेंभुर्णी येथे तरुणास पोलिसांकडून मारहाण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

टेंभुर्णी : प्रतिनिधी 

खोट्या गुन्ह्यात अडकवून निष्पाप तरुणास नाहक मारहाण करीत त्याचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याची सांगलीतील घटना ताजी असताना टेंभुर्णीतही एका तरुणास सहा-सात पोलिसांनी बेल्टने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. संतोष ऊर्फ बापू हनुमंत बोडरे (वय 24, रा.आढेगाव, ता. माढा) असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, संबंधित पोलिसांवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा विविध संघटनांनी दिला आहे. 

टेंभुर्णीतील सराफ असोसिएशनचे  विजयकुमार कोठारी यांच्याकडे  बोडरे हा  कामास आहे. तो शनिवारी सायंकाळी 6 वा. पुणे-सोलापूर महामार्गावर गर्दी का झाली आहे हे पाहण्यास गेला होता. तेथे काही जण बसवाहक, चालक यांना मारहाण करीत होते. यामुळे संतोष याने मारहाणीचा फोटो मोबाईलमध्ये काढण्याचा प्रयत्न केला. तो फोटो काढत असताना तेथे चार-पाच पोलिस जीपसह हजर झाले. त्यांनी संतोष बोडरे यास फोटो का काढतोस असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर त्यास धरून पोलिस जीपमध्ये कोंबले व पुन्हा जीपमध्ये मारहाण केली. मारहाण का करता, माझी चूक काय आहे, असे विचारल्यावरून आणखी जास्त मारले. नंतर पोलिस ठाण्यात नेऊन परत पोलिस उपनिरीक्षक ढाकणे व इतर सहा-सात पोलिसांनी एका खोलीत घालून अर्धा तास पट्ट्याने, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. मारहाण सुरू असताना तेथे विजयकुमार कोठारी हे आले. यामुळे पोलिसांनी मारहाण करणे बंद केले. मारहाण करताना का मारता असे विचारताच पोलिस तोंडावर मारत होते. या मारहाणीत बोडरे यास पायावर, पाठीत, हातावर, तोंडावर जबर मारले.अवघड जागेवर, पोटात लाथा मारल्या. मारहाण करताना तू कोणत्या जातीचा आहेस, असे विचारले. मी रामोशी समाजाचा आहे, असे सांगताच पुन्हा जास्त मारले. यानंतर कोठारीबरोबर त्यास सोडून दिले. तो घरी आल्यानंतर त्यास चालता येईना, त्रास होऊ लागल्याने त्यास रात्री नऊच्या सुमारास खासगी  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

संतोष बोडरे यास रविवारी चालताही येईना. पाठीत लाथा मारल्याने व जीपचा दरवाजा जोरात मारल्याने त्याच्या मणक्यास गंभीर दुखापत झाली आहे. त्याचा मणक्याला सूज आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  या मारहाण प्रकरणाची  अखिल भारतीय जय मल्हार क्रांती संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष दौलतराव शितोळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी संतोष बोडरे याची भेट घेऊन विचारपूस केली.

दरम्यान, शितोळे यांनी पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली व कारवाई करण्याची मागणी केली. तसेच संतोष बोडरे यास  मारहाण करणार्‍या संबंधित पोलिस उपनिरीक्षक व पोलिस कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करून सर्वाना दोन दिवसात निलंबित करावे अन्यथा 29 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11 वा. टेंभुर्णी पोलिस ठाण्यावर रामोशी, बेडर, बेरड समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.

यावेळी अखिल भारतीय जयमल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दौलतराव शितोळे, संजय चव्हाण, बंडू माने, भारत जाधव, सुरेश बोडरे, भारत पाटोळे, बापू जाधव, किरण जाधव, कुसुम पाटोळे, राजाबाई बोडरे या कार्यकर्त्यांसह रामोशी बेडर समाजाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.