Thu, Jul 18, 2019 21:56होमपेज › Solapur › ‘त्या’ विषबाधेचा योग्यरितीने तपास : पालकमंत्री

‘त्या’ विषबाधेचा योग्यरितीने तपास : पालकमंत्री

Published On: Jan 21 2018 2:57AM | Last Updated: Jan 20 2018 9:11PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेचे सभागृहनेते सुरेश पाटील आजारी असल्याने त्यांच्यावर मुबंई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान रक्त तपासणीमध्ये त्यांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. याचा तपास योग्य रितीने सुरू असून वेळप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेऊन सीआयडी तपासाची मागणी करण्यात येईल, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शनिवारी निवडक पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

पाटील यांना सहा डिसेंबर रोजी मधुमेहाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सोलापुरातील मार्कंडेय सहकारी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तिथे आठ दिवस उपचार घेऊनही प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पाटील यांना पुण्यातील पुणे हॉस्पिटलमध्ये हलविले. या हॉस्पिटलमध्येही दहा ते बारा दिवस उपचार घेतल्यानंतरही प्रकृतीमध्ये सुधारणार न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पंधरा दिवसांपूर्वी मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी केलेल्या पाटील यांच्या रक्ततपासणीमध्ये सुरेश पाटील यांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न होताच बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पोलिसांत फिर्याद दिली. 

शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बसपाच्या नगरसेवकांनी सभागृहनेते सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या विषबाधेची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत गोंधळ घातला होता. यासंदर्भात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना विचारले असता त्यांनी पाटील यांच्यावर झालेल्या विषबाधेचा मुंबईचे पोलिस योग्य रितीने तपास करीत आहेत. त्यामुळे विरोधकांनी यात राजकारण आणू नये. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांना भेटून सीआयडी तपासाची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.