होमपेज › Solapur › पंतप्रधान मोदींनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्तांना दिल्या मराठीत शुभेच्छा 

पंतप्रधान मोदींनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्तांना दिल्या मराठीत शुभेच्छा 

Published On: Jul 12 2019 9:00AM | Last Updated: Jul 12 2019 9:00AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आज (दि.१२) साजर्‍या होत असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विठ्ठलभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा! विठुराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना! असा पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मराठीत शुभेच्छा संदेश दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचा महिमा आणि वारीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

पंढरपूर वारी एक अद्भूत यात्रा आहे. पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील एक पवित्र शहर आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी पंढरपूरच्या वारीचे महत्व अधोरेखित केले आहे.

याआधीही मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमातून देशातील प्रत्येक नागरिकाने एकदा तरी वारीला जायला हवे, असे आवाहन केले होते.

आषाढी एकादशीनिमित्त सुमारे १० लाखांहून अधिक वारकर्‍यांच्या मांदियाळीने पंढरी नगरी अक्षरश: दुमदुमून गेली आहे. पंढरीची वारी, सावळ्या विठ्ठलाचे दर्शन, चंद्रभागेचे पवित्र स्नान आणि संतांच्या गाठी-भेटी या हेतूने गेल्या महिन्याभरापासून राज्यासह शेजारील कर्नाटक, आंध्र, मध्यप्रदेशातूनही काही दिंड्या, पालख्या पंढरीकडे निघाल्या होत्या. त्या सर्व पालख्या, हजारो दिंड्या आणि सुमारे १० लाखांहून वारकरी आषाढ शुद्ध दशमीच्या मुहूर्तावर पंढरपुरात दाखल झाले आहेत.