Mon, Aug 19, 2019 00:40होमपेज › Solapur › प्लास्टिकबंदी : 43 व्यापार्‍यांना दणका

प्लास्टिकबंदी : 43 व्यापार्‍यांना दणका

Published On: Jun 23 2018 10:57PM | Last Updated: Jun 23 2018 10:38PMसोलापूर : प्रतिनिधी

राज्यात शनिवारपासून प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. प्लास्टिक पिशवी वापरणार्‍यांवर राज्यात ठिकठिकाणी कारवाईचे सत्र सुरू होते. त्याचअनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या विविध झोन कार्यालयांनीदेखील त्यांच्या हद्दीत प्लास्टिकविरोधी जोरदार मोहीम राबविली. पहिला दणका सोलापूर-मंगळवेढा रोडवरील रिलायन्स मार्केटला देण्यात आला. या कारवाईला स्थानिक व्यापारीवर्गाने विरोध केल्याने काही ठिकाणी तणावही निर्माण झाला होता. दिवसभर राबविलेल्या विशेष मोहिमेने तब्बल 600 किलो प्लास्टिक हस्तगत करण्यात आले असून, 43 व्यापार्‍यांवर कारवाई करत, दोन लाख 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

प्लास्टिकबंदी कायद्यांतर्गत प्लॅस्टिक पिशव्या बाळगणार्‍या दुकानदारांची तपासणी करण्यासाठी शनिवारी महापालिकेच्या आठ विभागीय कार्यालये, आरोग्य विभाग, मंडई विभाग यांच्यावतीने दहा पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी सकाळपासून कारवाई सुरू केली. सायंकाळी सहावाजेपर्यंत ती सुरू होती. रिलायन्स उद्योग समुहाच्या सोलापुरातील मंगळवेढा रस्त्यावरील रिलायन्स मार्केट स्टोअरवर पहिली कारवाई झाली. झोन क्रमांक सहाचे अधिकारी हणमंत आदलिंगे आणि त्यांच्या दोन सहकार्‍यांनी थेट स्टोअरमध्ये जाऊन काऊंटरवरच्या ड्रॉव्हरची तपासणी केली. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या आढळल्या. त्या पूर्वीच्या राहिलेल्या पिशव्या असून, त्या ग्राहकांना देत नसल्याचे स्टोअरच्या अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र प्लास्टिक पिशव्या बाळगणेही नियमबाह्य असल्याने त्यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर नवीपेठ, टिळक चौक, अशा गावठाण भागापासून ते अक्कलकोट रस्ता एमआयडीसी, सत्तर फुटी रस्ता येथपर्यंत आणि पुढे  होटगी रस्ता, विजापूर रस्ता, जुळे सोलापूर येथील हद्दवाढ भागापर्यंत अनेक ठिकाणी कारवाया झाल्या. सोलापुरातील सर्वात गजबजलेल्या नवीपेठेत विभागीय अधिकारी क्रमांक एकचे अधिकारी मोहन कांबळे यांनी प्रवेश केल्यावर अनेक दुकानदारांची चांगलीच धावपळ उडाली. नामदेव चिवडा या प्रसिध्द दुकानापासून त्यांनी तपासणीला सुरुवात केली. पाच हजारांचा दंड वसूल केल्याची बातमी नव्यापेठेत वार्‍यासारखी पसरली आणि आपल्याजवळील पिशव्या लपवून ठेवण्यासाठी व्यापार्‍यांची धावपळ सुरु होती. नामदेव चिवडा, सोनी साडीज, दिवेकर बेकरी यांच्याकडून दंड वसूल केला गेला. प्रशासनाच्या या कारवाईला नव्या पेठेतील व्यापार्‍यांनी विरोध केला. काहींनी दुकाने बंद करून याचा निषेध व्यक्त केला, तर काहींनी तपासणी टाळण्यासाठी दुकाने बंद केली व तपासणी समिती नव्या पेठेतून पुढे जाताच पुन्हा दुकाने उघडली. 

सर्वाधिक फटका ‘अन्नपूर्णा’ला!

प्लॅस्टिक पिशव्या बंदीच्या दंडात्मक कारवाईचा सर्वाधिक फटका अन्नपूर्णा नमकीनला बसला. एका दुकानात प्लास्टिक पिशव्या सापडल्या की पाच हजारे रुपये दंड असा नियम आहे. अन्नपूर्णा नमकीनच्या शहरातील तीनही दुकानांवर विविध झोन अधिकार्‍यांनी तपासणी केली. त्यावेळी तेथे प्लास्टिक पिशव्या आढळल्याने त्यांच्या तीनही दुकानांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे पंधरा हजार रुपयांचा दंड वसूल झाला.
कारवाई झालेल्या दुकानांची नावे अशी ः रिलायन्स मार्केट (देगाव रोड), नामदेव चिवडा (नवी पेठ), सोनी सारीज (नवी पेठ), दिवेकर बेकरी (नवी पेठ), ओम फुडज प्रोडक्शन (भवानी पेठ), अन्नपूर्णा नमकीन (भवानी पेठ), अन्नपूर्णा नमकीन (मंगळवार पेठ), अन्नपूर्णा नमकीन (सात रस्ता), मोहन मणी फुड्स (भवानी पेठ), भूमकर ट्रेडर्स (मधला मारूती), विजय कटलरी (मधला मारूती), विनोद पवार (मधला मारूती), नौशाद ट्रेडर्स (मधला मारूती), भूमकर मिल्क शोरूम (कोंतम चौक), रोनक ट्रेडर्स (कोंतम चौक), गांगजी हँडलूम (कोंतम चौक), बाकळे कटपीस (विजापूर रोड), गोवर्धन प्रोव्हिजन स्टोअर्स (विजापूर रोड), लक्ष्मी जर्नादन बेकरी (विजापूर रोड), नट्स मिठाई (भारती विद्यापीठ जवळ), मनमंदिर स्टेशनरी  (विजापूर रस्ता), न्यू गणेश फरसाण अ‍ॅण्ड स्वीट्स (मरिआई चौक), साई सुपर मार्केट (दमाणी नगर), न्यू बेंगलोर अय्यंगार बेकरी (विजापूर रोड), महालक्ष्मी दूध डेअरी (शर्मा स्वीट्स), अंबिका जनरल स्टोअर्स (दक्षिण सदर बजार), गोविंद मेडिकल (दक्षिण सदर बजार), जैनोद्दीन नदाफ  (शास्त्री नगर), निर्मल होजिअरी (गेंट्याल शॉपिंग सेंटर), साई-समर्थ गृह वस्तू भंडार (कुर्बान हुसेन नगर), सुप्रजा हॉटेल (महावीर चौक), गणेश नमकीन (महावीर चौक), विशाल अक्षी एंटरप्रायझेस (दाजी पेठ), मधू वस्त्रालय (दाजी पेठ), एस. एन. चाटला (दाजी पेठ), प्रवीण होजिअरी (अशोक चौक), इंडियन सुपर सेल (अशोक चौक), अथर्व फॅशन जीन्स (अशोक चौक), सक्सेस जीन्स (अशोक चौक), बेंगलोर फॅशन सेंटर (अशोक चौक), रविंद्र भास्कर श्रीमल (अशोक चौक), व्यंकटेश गपलाल(अशोक चौक).

महापालिकेची तिजोरी भरणार महापालिकेचे बजेट नुकतेच सादर झाले होते. त्यामध्ये उत्पन्नवाढीचे स्त्रोत वाढविण्यासाठी बरेच उपाय सूचविले गेले होते. मात्र, त्यावेळी प्लास्टिक बंदीतून मिळणार्‍या उत्पन्नाची कुणालाच कल्पना नव्हती. ही मोहीम अतिशय काटेकोर चालविली, तर याच दंडातून महापालिकेच्या तिजोरीत कोटी रुपयांची भर पडू शकते. त्यामुळे हा कायदा जसा पर्यावरणासाठी फायद्याचा ठरतो आहे, तसाच तो महापालिकेच्या तिजोरीसाठीही फायद्याचा ठरतो आहे.