होमपेज › Solapur › आकडेमोड चेअरमनपदाची, गणिते विधानसभेची

आकडेमोड चेअरमनपदाची, गणिते विधानसभेची

Published On: Jul 14 2018 12:57AM | Last Updated: Jul 13 2018 11:29PMसोलापूर : महेश पांढरे 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या गटाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सोमवार, 16 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी बाजार समितीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदाची निवड करण्यात येणार आहे.

 सध्या दक्षिण, उत्तर आणि अक्कलकोट विधानसभा मतदारांघातील काही गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या सोलापूर बाजार समितीसाठी या तीनही तालुक्यांचे राजकारण डोळ्यासमोर ठेवूनच बाजार समितीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनपदाची आकडेमोड वरिष्ठ नेतेमंडळींनी सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरुध्द सर्वपक्षीय नेतेमंडळी अशी ही निवड झाली आहे. दुसरीकडे सहकारमंत्री सुभाष देशमुख हे स्वत: दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे पुन्हा त्यांना विधानसभेत घेरण्यासाठीची रणनीती या निवडणुकीनिमित्ताने आखण्यात येत आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघावर माजी आ. दिलीप माने यांचा डोळा आहे. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीत मिळालेल्या यशाचा पुरेपूर फायदा आता विधानसभा निवडणुकीत करुन घेण्यासाठी त्यांनी व्युहरचना सुरु केली आहे. अक्कलकोट तालुका विधानसभा मतदारसंघातील काही गावे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनीही या निवडणुकीचा आणि पदाधिकार्‍यांचा फायदा आपल्याला व्हावा तसेच त्या कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांना बाजार समितीमध्ये संधी मिळावी यासाठी म्हेत्रे यांनीही प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे त्यांनी श्रीशैल नरोळे यांचे नाव पुढे केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी कमी करण्यासाठी आता चेअरमनपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धनगर समाजाच्या मतांचा विचार केल्यास काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री देवकते गटाचे नेते बाळासाहेब शेळके यांना पहिल्यांदा चेअरमन करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. दुसरीकडे याच पॅनलमधून जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख निवडून आले आहेत. 

त्यामुळे चौकशीच्या फेर्‍यात अडकलेल्या बाजार समितीच्यामागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा नको यासाठी कदाचित पालकमंत्र्यांनाही चेअरमनपदासाठी पाचारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पदाधिकारी निवडीवर काँगे्रसच्या दोन आमदारांचे भवितव्य
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीवर काँग्रेसच्या दोन आमदारांचे भवितव्य ठरणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी दक्षिण, उत्तर आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे अक्कलकोटचे विद्यमान आमदार सिध्दाराम म्हेत्रे, दक्षिण माजी आ. दिलीप माने यांनी बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी सोयीच्या व्हाव्यात यासाठी अट्टाहास धरला असून भविष्यात विधानसभा निवडणुकीत त्यांना लाभ होईल, अशी रचना करण्यात येणार आहे.