Wed, Mar 20, 2019 08:46होमपेज › Solapur › पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना लाच घेताना अटक

पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना लाच घेताना अटक

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 11:40PMसोलापूर : प्रतिनिधी

दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी 8 हजार रुपयांची लाच घेताना अशोक चौक पोलिस  चौकीच्या पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी साडेअकराच्या सुमारास पोलिस चौकीतच करण्यात आली.

पोलिस उपनिरीक्षक केरू रामचंद्र जाधव (वय 57, रा. बुधवार पेठ, सोलापूर) आणि पोलिस नाईक संतोष रामचंद्र चव्हाण (ब. नं. 417,  वय 34, रा. कवठे, ता. उत्तर सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार व त्याच्या नातेवाईकांविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात भादंवि कलम 324, 504,34 प्रमाणे गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास अशोक चौकीचे सहायक फौजदार टंगसाळ यांच्याकडे आहे. दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी व तक्रादाराचा गुन्हा नोंद करण्यासाठी अशोकचौक पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक केरू जाधव यांनी तक्रारदाराकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने तडजोड करून तडजोडीअंती 8 हजार रुपये देण्याचे मान्य केले. दरम्यानच्या काळात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची खातरजमा करून मंगळवारी सकाळी अशोक चौक पोलिस चौकीच्या परिसरामध्ये सापळा लावला.

सकाळी साडेअकराच्या सुमारास अशोक चौक पोलिस चौकीमध्ये तक्रारदाराकडून पोलिस नाईक संतोष चव्हाण यांच्यामार्फत  8 हजार रुपयांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक केरू जाधव यांना रंगेहाथ पकडले. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मारकड तपास करीत आहेत.