Sat, Jul 20, 2019 10:40होमपेज › Solapur › अधिकमास अखेरीस भाविकांची पंढरीत गर्दी

अधिकमास अखेरीस भाविकांची पंढरीत गर्दी

Published On: Jun 11 2018 1:09AM | Last Updated: Jun 10 2018 7:57PMपंढरपूर : प्रतिनिधी 

अधिकमहिना  अखेरच्या टप्प्यात आल्याने भाविकांनी पंढरीत चंद्रभागा स्नानासाठी व श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर भाविकांनी फुलला असून प्रासादिक साहित्यालाही भाविकांतून चांगली मागणी होत आहे. 

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत अधिकमासानिमित्त राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच आंध्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, गुजरात आदी राज्यातूनही भाविकांनी उपस्थिती लावली आहे. दि. 16 मे पासून सुरू झालेला अधिकमास येत्या बुधवार दि. 13 जून रोजी संपत आहे. पहिल्या दिवसापासूनच भांविकांनी चंद्रभागा स्नानासाठी व श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरिता हजेरी लावली होती. शाळा, महाविद्यालये यांना उन्हाळी सुट्टी राहिल्याने अधिकमासात सहकुटुंब दर्शन घेण्यासाठी भाविक पंढरीत येत होते व येत आहेत. मंदिर समितीच्यावतीने भाविकांसाठी अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पिण्याचे पाणी, प्रथमोपचार यांची उपलब्धता करून देण्यात आली असून बांधण्यात आलेल्या शौचालयांचा वापरही भाविकासाठी खूला ठेवण्यात आला होता.

मंदिर परिसर व दर्शन रांगेत उन्हापासून  भाविकांना त्रास होऊ नये म्हणून शेडनेट उभारण्यात आले होते. दर्शन मंडपात उकाडा जाणवू नये म्हणून फॅन सुरू करण्यात आले होते. त्यामुळेच दर्शन रांगेतूनही दर्शन घेण्यासाठी भाविक तासोनतास रांगेत उभा राहत आहेत. सुरुवातील चंद्रभागेत पाणी कमी असल्याने स्नान करण्यास पाणी योग्य नव्हते. त्यामुळे अनेक भाविक स्नान करणे टाळत होते. तर अनेक भाविकातून स्नान न करता आल्यामुळे नाराजी व्यक्‍त केली जात होती. अखेर उजनीतून सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सोडण्यात आलेले पाणी मागील आठवड्यात चंद्रभागेत दाखल झाल्याने भाविकांची स्नानाची सोय झाली आहे.

एसटी सेवा बंद होती तरी भाविक खासगी वाहने, रेल्वेने ये जा करीत आहेत. अधिकमासानिमित्त बाजारपेठेतही भाविकांची गर्दी वाढत असल्याने उलाढालही मोठी होत आहे. प्रासादिक साहित्याला भाविकांतून मागणी वाढत आहे. 

त्यामुळे मागील कार्तिका यात्रेत घटलेली आर्थिक उलाढाल अधिकमासामुळे भरून निघाली असल्याची प्रतिक्रिया व्यापारीवर्गातून दिली जात आहे.
सोमवार, मंगळवार व बुधवार असे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे चंद्रभागेत स्नान करण्यासाठी व श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येऊ न शकणारे भाविक सद्या गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येते. भाविकांनी सोबत आणलेली वाहने पार्किंगला लावण्यात येत असल्याने कोणतीही वाहतूक कोंडी होताना दिसत नाही.