होमपेज › Solapur › भारतात सर्वात महाग पेट्रोल सोलापुरात

भारतात सर्वात महाग पेट्रोल सोलापुरात

Published On: Jan 23 2018 1:10AM | Last Updated: Jan 22 2018 11:06PM
सोलापूर : प्रतिनिधी

एकीकडे महागाईने सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत, तर दुसरीकडे पेट्रोलचा भडका उडत आहे. भारतामध्ये सर्वात महाग पेट्रोल सोलापुरात झाले आहे. मुंबई, बंगळुरू, दिल्ली, कोलकातापेक्षाही सोलापुरात पेट्रोलने उच्चांकी दर गाठला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पेट्रोलच्या दराचा अभ्यास केला असता 22 जानेवारीला विविध कंपन्यांच्या पेट्रोलपंपांत 80 ते 81 रुपये यादरम्यान प्रतिलिटरप्रमाणे दर होते. तर डिझेलचेदेखील दर वेगवेगळ्या पेट्रोल कंपन्यांच्या पंपांत 66 ते 67 रुपये इतके होते. वर्षाच्या सुरुवातीलाच भाव वाढत गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. देशात इतर शहरांच्या तुलनेत सोलापुरातील पेट्रोल व डिझेलचे दर नेहमीच वाढलेले असतात.

महाराष्ट्र राज्य सरकारचे कर(त्यामध्ये दुष्काळ निधीसह इत्यादी कर) व केंद्रीय उत्पादित करामुळे सोलापुरातील पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडलेले असतात. सोलापूर शहराच्या हद्दीबाहेर सोमवारी विविध पेट्रोलपंपात पेट्रोलचे दर 80 ते  80.50 रुपये प्रति लिटर असे भाव होते, तर 66 ते 66.50 पैसे डिझेलचे दर प्रति लिटरप्रमाणे होते. देशात राज्यांचा विचार केला असता महाराष्ट्र राज्यात पेट्रोलचे दर सर्वाधिक आहे. सोलापुरात येणारे पेट्रोल व डिझेल हे दोन वेळा रिफाईन केलेले असल्याने त्याचे दर अधिक होत आहे, अशी काही पेट्रोलपंप चालकांनी माहिती सांगितली. त्याला युरोफोर पेट्रोल असे म्हटले जाते.प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी दोन वेळा फिल्टर केले जाते.