Wed, Aug 21, 2019 01:53होमपेज › Solapur › कर्मचारी व भाविकांना कायमची निवास व्यवस्था : ना. रावते

कर्मचारी व भाविकांना कायमची निवास व्यवस्था : ना. रावते

Published On: Jun 29 2018 11:35PM | Last Updated: Jun 29 2018 11:27PMपंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी यात्रेत येणार्‍या भाविकांसाठी विभागवार बसस्थानक उभारण्यात आल्याने वाहतुकीचा होणार त्रास कमी होणार असून भाविकांच्या सोईचे ठरणार आहे. यात्रेसाठी जादा 3781 बसेसे उपलब्ध करून देण्यात आल्या असून भविष्यात बसस्थानक येथे येणार्‍या भाविकांना व एसटी कर्मचार्‍यांना कायमची निवास व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमिवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून करण्यात आलेल्या नियोजनाबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ना. रावते बोलत होते.याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संभाजी शिंदे, भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, आगारव्यवस्थापक मुकूंद दळवी, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय, जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, यात्रा काळात राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसेसची सोय करण्यात आली असून या बसेस तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या चंद्रभागा, विठ्ठल व भीमा बसस्थानक येथे थांबणार आहेत. भीमा व विठ्ठल बसस्थानक येथून चालत येणे भाविकांना शक्य होत नसल्याने भाविकांना शहरात येण्यासाठी शटल बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 तर यात्रा कालावधीत चंद्रभागा बसस्थानकातून बसेस सोडताना वाहतूक कोंडी निर्माण होते. याचा भाविकांनाही त्रास होतो. तो होऊ नये म्हणून या यात्रेत बसस्थानक येथून बसेसचा स्लॉट करून बसेस सोडण्यासाठी ठराविक वेळ पोलिस विभागाने निश्‍चित करून बसेस सोडण्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर खासगी वाहनेदेखील स्लॉट करून सोडण्यात यावीत, अशा सूचना  केल्या आहेत. यामुळे भाविक अडकून पडणार नाहीत. बसस्थानक येथे भाविकांसाठी पिण्याचे पाणी,  प्रथमोपचार केंद्र, शौचालये आदी अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देत आषाढी यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्य परिवहनच्या अधिकारी, कर्मचारी यांनी चोख भूमिका पार पाडावी असे आवाहन  ना.रावते यांनी केले. 

दरम्यान आषाढी यात्रेसाठी 3781 जादा बसेसची सोय करण्यात आली असून भीमा, चंद्रभागा व विठ्ठल अशी तीन तात्पुरती  बसस्थानके उभारण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. भीमा बसस्थानक येथे मराठवाड व विदर्भ येथील बसेस थांबतील. चंद्रभागा बसस्थानक येथे पश्‍चिम महाराष्ट्र व कोकण तर विठ्ठल बसस्थानक येथे खानदेश व नाशिक भागातील सर्व बसेस थांबणार आहेत.