Mon, Apr 22, 2019 04:20होमपेज › Solapur › सीएमसाहेब, आपणच पगाराचे काय ते बघा!

सीएमसाहेब, आपणच पगाराचे काय ते बघा!

Published On: Apr 12 2018 10:30PM | Last Updated: Apr 12 2018 9:33PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिका परिवहन उपक्रमाच्या बेमुदत बंदचा गुरुवारी चौथा दिवस होता. मात्र बंद मनपा प्रशासन, पदाधिकारी, स्थानिक मंत्र्यांकडून बेदखल झाल्याने मेटाकुटीला आलेल्या कर्मचार्‍यांनी चक्‍क  मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे ‘सीएमसाहेब आपणच पगाराचे काय ते बघा’ अशी साद घालत थकीत वेतनासाठी साकडे घातले आहे.

प्रचंड तोट्यात असलेल्या परिवहन उपक्रमाची अवस्था मरणासन्न अशीच झाली आहे. पगार नियमित होत नसल्याने दर तीन-चार महिन्यांनी लाक्षणिक बंद, बेमुदत बंदचे हत्यार उपसण्याबरोबरच कामगार न्यायालयाकडे दाद मागण्यात येत आहे. थकीत पगार करणे महापालिकेला भाग आहे, पण आर्थिक अडचण असल्याने संपूर्ण थकीत रक्‍कम एकवट देण्याचे मनपासमोर आव्हान आहे. एकीकडे महापालिका कर्मचार्‍यांचे पगार नियमित करणे मुश्किल असताना परिवहन कर्मचार्‍यांचा पगार कसा करायचा, असा प्रश्‍न मनपा प्रशासनासमोर पडला आहे.

नऊ महिन्यांच्या थकीत वेतनासाठी परिवहन उपक्रमाच्या सुमारे 450 कर्मचार्‍यांनी मनपा लाल बावटा कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून बेमुदत बंदचे हत्यार उपसले खरे, पण चार दिवस होऊनही महापालिका प्रशासन व पदाधिकार्‍यांकडून बंद बेदखल आहे. गुरुवारी कामगार नेते नरसय्या आडम यांनी सात रस्ता बस डेपोजवळ येऊन कामगारांची भेट घेतली. 

यावेळी बोलताना आडम म्हणाले, गेल्या नऊ महिन्यांचे वेतन थकीत आहे. नियमित पगार करण्याची जबाबदारी मनपाची आहे, पण प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. कुठल्याही परिस्थितीत थकीत रक्कम मिळाल्याशिवाय बंद मागे घेणार नाही, असा इशारा आडम यांनी यावेळी दिला.  यावेळी युनियनचे सरचिटणीस सिद्धप्पा कलशेट्टी, महिबूब हिरापुरे, अनिल वासम आदी उपस्थित होते. 

उपासमारीतून मुक्त करा...!
दरम्यान, बंदचा चौथा दिवस असून महापालिका, परिवहन समितीचे पदाधिकारी तसेच प्रशासनाने बंदची दखल घेतली नाही. त्यामुळे आपल्याला कोणी वाली नाही अशी भावना करुन घेत कर्मचार्‍यांनी गुरुवारी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. 

पोस्टकार्डवर थकीत नऊ महिन्यांचे वेतन तातडीने करा, असा मजकूर लिहून कामगारांनी आपल्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्या आहेत. जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत 144 बसेस मिळाल्या. यापैकी 98 बसेसच्या चेसी क्रॅक झाल्याने बाद झाल्या आहेत. काही बसेस जळाल्या. यामुळे एकूण 32 कोटींचे नुकसान झाले आहे. 9 महिने वेतन न झाल्याने उपासमार होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी याप्रश्‍नी हस्तक्षेप करुन आम्हाला उपासमारीतून मुक्त करण्याची विनवणीही या पत्रात करण्यात आली आहे.