Fri, Mar 22, 2019 07:42होमपेज › Solapur › पतंगरावांनी विशिष्ट वर्गाची मक्‍तेदारी मोडली

पतंगरावांनी विशिष्ट वर्गाची मक्‍तेदारी मोडली

Published On: Mar 14 2018 10:08PM | Last Updated: Mar 14 2018 9:58PMसोलापूर : प्रतिनिधी

पतंगराव कदम हे एक चैतन्यदायी व्यक्‍तिमत्त्व होते़ पांढरपेशासारख्या पुण्यात जाऊन त्यांनी शिक्षणाचा झेंडा रोवला़ विशिष्ट वर्गाची मक्‍तेदारी मोडीत काढली़ शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या मुलांपर्यंत पोहोचवली़, अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक गो.मा. पवार यांनी व्यक्‍त केली. 

राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आ़ डॉ़ पतंगराव कदम यांचे नुकतेच निधन झाले़  त्यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यासाठी डॉ़   निर्मलकुमार फडकुले सभागृहात मंगळवारी सायंकाळी शोकसभा आयोजित करण्यात आली होती़  याप्रसंगी जवळून अनुभवलेले व्यक्‍तिमत्त्व, क्षण अनेकांनी मांडत त्यांना श्रद्धांजली वाहिली़ 

माजी आमदार दिलीप माने आणि भारती विद्यापीठचे संघटक संयोजक संजय कलगोंडा-पाटील यांनी ही शोकसभा आयोजित केली होती़ याप्रसंगी अश्‍विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपीभाई पटेल, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, डॉ़  राजेंद्र घुली, मनोहर सपाटे, धर्मा भोसले, जयश्री दिलीप माने, पृथ्वीराज माने, डॉ़ व्ही़ एस़ मंगनाळे आदी उपस्थित होते.
माजी आमदार दिलीप माने हे आपल्या भावना व्यक्‍त करताना त्यांनी विश्वजित कदम आणि माझ्यात कधीच भेदभाव केला नसल्याचे म्हणाले़  माझ्या राजकीय जीवनात त्यांचा राजकीय सल्ला मोलाचा होता़ वडील ब्रह्मदेव माने यांच्या निधनानंतर पतंगरावांनी मला पोरकेपणा जाणवू दिला नाही़  माझ्या पाठीशी उभे राहिले़  आता यापुढे त्यांची उणीव जाणवेल, अशी खंतही त्यांनी व्यक्‍त केली़ 
पतंगराव कदम हे मला आपली मानसकन्या म्हणून पाहायचे़ स्वत:ची मुलगी मानून त्यांनी काळजी घेतली़ माझ्या कुटुंबाला त्यांचा खूप मोठा आधार होता़ त्यांच्या जाण्याने अनेक जणांना पोरकेपणाची जाणीव होणार आहे़, असे पोलिस आयुक्‍त पोर्णिमा चौगुले म्हणाल्या.

महान व्यक्‍तिमत्त्व लाभले हे महाराष्ट्राचे भाग्यच़ धर्मनिरपेक्षतेचा पाया घातला गेला आणि या काळात त्यांनी खूप मोठे विश्व निर्माण केले़ सोलापुरात झालेल्या साहित्य संमेलनासाठी त्यांनी पाच लाख रुपये दिले़, असे माजी आमदार निर्मलाताई ठोकळ म्हणाल्या.   

शिक्षण, औद्योगिक आणि सहकार क्षेत्रात खूप मोठे योगदान पतंगरावांनी दिल्याचे सांगून त्यांच्या जाण्याने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. आपल्या जवळच्या माणसाला एकेरी हाक मारण्यात त्यांना आनंद होता़  एखादी गोष्ट पटली नाही तर ते थेट मुख्यमंत्र्यांनाही सुनावत होते़ अशी आठवण माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितली. 

सोलापूरचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला़ रयतसाठी त्यांनी 54 शाळा मंजूर करून आणल्या़  त्यापैकी दहा शाळा सोलापूरसाठी होत्या़ चिंचोळी एमआयडीसीला ड दर्जा उपलब्ध करवून दिला़ होटगी रोड नाईट लँडिंगसाठी स्वत:च्या निधीतून सहायता दिल्याची आठवण संजीव पाटील यांनी सांगितली. 

खासगी विद्यापीठाची संकल्पना सर्वप्रथम त्यांनी समोर आणली़  पुण्यात व्यवस्थापन अभ्यासक्रम असताना त्यांनी आपल्या संस्थेतून सुरू करून मक्‍तेदारी मोडीत काढली़  एखादी शैक्षणिक संस्था कॉर्पोरेट पद्धतीने चालवू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले़ ते गतिमान नेतृत्वाचे होते़ 1994 मध्ये दिल्लीमध्ये शैक्षणिक संस्था सुरू केली़ अशी आठवण प्रा. विलास पात्रुडकर यांनी व्यक्‍त केली.  
शैक्षणिक संस्थांसाठी ते एक रोल मॉडेल होते़ यशवंतराव चव्हाणांचे शैक्षणिक धोरण त्यांनी खर्‍याअर्थाने राबविले अशी भावना  इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी यांनी व्यक्‍त केली.