Sat, Jul 20, 2019 21:30होमपेज › Solapur › पंढरीत वाहतूक कोंडीची समस्या कायम

पंढरीत वाहतूक कोंडीची समस्या कायम

Published On: May 14 2018 11:15PM | Last Updated: May 14 2018 10:32PMपंढरपूर : प्रतिनिधी

मागील महिन्यात पंढरपूर शहरात शहर वाहतूक पोलिस शाखा व सोलापूर  वाहतूक शाखेच्यावतीने विशेष मोहीम राबवून अवैध वाहतूक व वाहतूक कोंडींवर नियंत्रण मिळवले होते. मात्र मेच्या सुरुवातीपासून परिस्थिती ‘जैसे थे’च राहिल्याने वाहतूक कोंडीचा त्रास सातत्याने वाहनधारक व नागरिकांना सहन करावा लागत आहे. 

दक्षिण काशी असलेल्या पंढरीत श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून दररोज हजारो भाविक येतात. या भाविकांनी सोबत आणलेली वाहने पार्किंग करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर अस्तावेस्तपणे वाहने उभी करण्यात येत असल्यानेही वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. नगरपालिका व वाहतूक शाखेच्यावतीने मुख्य रस्त्यांवर, पिवळे पट्टे,   नो हॉकर्स झोन, सम विषम तारीख पार्किंग व्यवस्था राबविण्यात आली आहे. मात्र याचे केवळ बोर्डच दिसून येतात. कारवाई मात्र केली जात नसल्याने नो हॉकर्स झोन, सम विषम तारीख पार्किंग फॉर्म्युला कुचकामी ठरत आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांचा वचक कमी झाल्याने लोक रस्त्यावरील पिवळ्या पट्टीच्या आत दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहने उभी करतात. स्टेशन रोडवर नेहमी भाविक व नागरिकांची गर्दी असते. या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वरिष्ठ पातळीवरुन आदेश देण्यात आले आहेत. परंतु वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानता वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुख्य चौकात उभा राहून सावज हेरण्यापलिकडे वाहतूक शाखेचे कर्मचारी काहीही कामगिरी करत नाहीत. त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.स्टेशन रोड, जुना सोलापूर रोड, भक्‍तीमार्ग, बसस्थानक रोडवर सातत्याने वाहतुक कोंडी होत आहे. रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या दुचाकींमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. सोमवारी दुपारी नगरपालिकेसमोर दोन चारचाकी वाहने एकमेकांना घासल्याने दोन्ही चालकांनी भर रस्त्यात  वाहने उभी करून वाद चालू केला. यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणार्‍या वाहनधारकावर वाहतूक पोलिसांनी कारवाई चालू ठेवावी व नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येतून बाहेर काढावी अशी मागणी भाविक, नागरिकांतून होत आहे.

 वाहतूक शाखेने सुरु केलेली विशेष मोहीम झाली बंद 

 स्टेशन रोडवरील नो हॉकर्स झोन फलक नावापुरते

सम विषम तारीख फॉर्म्युला कुचकामी

 वाहतूक शाखेचे चौकावर लक्ष; वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष

 पिवळ्या पट्ट्यांच्या आत वाहने 

 वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी