Mon, Apr 22, 2019 21:39होमपेज › Solapur › पंढरपूर शहरातील पार्किंग व्यवस्थेचा खेळखंडोबा

पंढरपूर शहरातील पार्किंग व्यवस्थेचा खेळखंडोबा

Published On: Mar 16 2018 11:07PM | Last Updated: Mar 16 2018 10:37PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरीत दररोज येणार्‍या भाविकांची संस्था वाढत असून येणार्‍या भाविकांची वाहने व शहरातील वाहने यांचा विचार करता नगरपालिकेने शहरातील अकरा ठिकाणच्या जागा पार्किंगसाठी राखीव ठेवल्या आहेत. शहरातील रस्त्यावर सम-विषमच्या पाट्या लावल्या आहेत.  मात्र पार्किगच्या जागी अतिक्रमणे वाढत असल्याने शहरातील पार्किंग व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे.

पंढरपूर नगरपालिकेच्या अकरा ठिकाणी पार्किंगच्या जागा उपलब्ध असून त्यापैकी बहुतांशी वाहनतळावर वाहनांची पार्किंग होत नाही. शहरातील पार्किंगच्या जागा व्यवस्थित माहित नसल्याने येणार्‍या भाविकांकडून शहरात गाड्यांची पार्किंग कुठेही होते. त्यामुळे नेहमी वाहतुकीची कोंडी होते. वाहतूकीच्या शिस्तीसाठी सम-विषम तारखा, वाहन जॅमर, पार्किंगची व्यवस्था आहे. परंतु सम-विषमचा, पार्किंगचा, कोणी वापर करत असल्याचे दिसत नाही. शहरातील पार्किंगच्या जागेवरील वाढलेली अतिक्रमणे ह्यामुळे शहरातील शिवाजी चौक, स्टेशन रोड, गजानन महाराज मठ, संपूर्ण प्रदक्षणा रोड, आपटे प्रशाला, मुक्ताबाई मठ, दत्तघाट, तांबडा मारूती, महाद्वार चौक, सहकार चौक, कालिकादेवी चौक, संभाजी चौक, काळामारूती, चौफाळा परिसर, जिजामाता उद्यान, कैकाडी महाराज मठ, आदी जागा मुख्य रदहदारीच्या आहेत. ह्या रस्त्यावर कुठेही केलेल्या पार्किंगमुळे नेहमी वाहतूक कोंडी होत आहे.

नगरपालिकेने शहरात निश्‍चित केलेली पार्किंगंची ठिकाणी आहेत. परंतु टपरी धारक, हातगाडे, खोके, भेळ, वडापाव, चहावाले यांचे अतिक्रमण त्या जागी झाले आहे. तर काही ठिकाणची पार्किंग जागा माहित नसल्याने कचरा टाकण्याची ठिकाणे झाले आहेत. नगरपालिकेने वाहतूक पोलिसांना जॅमरची उपलब्धता करून दिली आहे. सम-विषम तारखांचे फलक लावले आहेत. परंतु शहर वाहतूक शाखेकडून यासंदर्भात अपेक्षीत कारवाई होत नाही असे दिसून येते. त्यामुळे कुठेही सहज होणार्‍या वाहन पार्किंगमुळे नागरिकांना  वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.नगरपालिका  व पोलिस प्रशासन यांच्या समन्वयाचा अभाव असल्याचे दिसत असून  पालिका आणि वाहतूक शाखा एकमेकांवर जबाबदारी टोलवत असल्याचे अनुभवास येत आहे.