Tue, Nov 13, 2018 08:35होमपेज › Solapur › ‘पँथर’ झाला महामंडळाचा अध्यक्ष

‘पँथर’ झाला महामंडळाचा अध्यक्ष

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 9:53PMसोलापूर : प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वीच सोलापूरात झालेल्या कार्यक्रमात ना. रामदास आठवले यांनी ‘राजाभाऊ सरवदे यांना मंत्री बनविल्याशिवाय सोलापूरकरांना तोंड दाखवणार नाही’, असा दृढनिश्‍चय बोलून दाखवला होता. हा शब्द खरा ठरवत राजाभाऊ सरवदे यांची महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महामंडळ अध्यक्षपदाच्या रुपाने रिपाइंला राज्यात राजकीय बळ मिळाले आहे. 

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द लोकांना स्वयं-रोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मा फुले महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत काम करते. सामाजिक न्याय खात्याचे केंद्रीय राज्यमंत्रीपद रामदास आठवले यांच्याकडे आहे.

पक्षनिष्ठेचे फळ

राजाभाऊ सरवदे हे ना. आठवले यांचे निकटवर्तीय समजले जातात. दलित पँथरच्या स्थापनेपासून 1972 पासून सरवदे हे आठवले यांच्यासोबत काम करीत आहेत. 
आंबेडकरी चळवळीची परंपरा

राजाभाऊ सरवदे यांचे आजोबा रामा तुकाराम सरवदे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे कार्यकर्ते होते. सोलापूरात थोरला राजवाडा येथे झालेल्या वतनदार परिषदेचे ते ट्रस्टी होते. 

रिपाइंला प्रथमच अध्यक्षपद

राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेस-रिपाइंचे सरकार असताना रिपाइंला मंत्रीपदा व्यतिरिक्त कोणतेही पद मिळाले नव्हते. खा. आठवले यांनी अनेकदा रिपाइंला महामंडळाचे अध्यक्षपद मिळावे, अशी जाहीर मागणीही केली होती. मात्र त्यांची ही मागणी गांभिर्याने घेतली जात नव्हती. सध्या रिपाइं भाजप-शिवसेना सरकारसोबत आहे. विशेष म्हणजे रिपाइंला अध्यक्षपदाचा मान प्रथमच राजाभाऊ सरवदे यांच्या रुपाने मिळाला आहे.