Fri, Apr 26, 2019 15:46होमपेज › Solapur › गावाच्या वेशीवर तुफान आलंया

गावाच्या वेशीवर तुफान आलंया

Published On: Apr 08 2018 10:19PM | Last Updated: Apr 08 2018 9:27PMसोलापूर : प्रतिनिधी

पाणी फौंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या तिसर्‍या टप्प्यात राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये 75 तालुक्यांचा सहभाग असून त्यामध्ये 4036 गावांत श्रमदानाचे काम होत आहे. सोलापुरात होत असलेल्या वॉटर कप स्पर्धेत मंगळवेढा, उत्तर सोलापूर, सांगोला, करमाळा आणि माढा तालुक्यातील 235 गावांचा सहभाग आहे.

दरम्यान, पाणी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप-3 स्पर्धेस प्रारंभ झाला आहे़ उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे रविवार, 8 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 10 यावेळेत पर्यावरणप्रेमी, गावकरी, विविध संस्थांच्या वतीने महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते.

ही स्पर्धा म्हणजे दुष्काळी गावांसाठी एक खूप मोठ्या प्रमाणात आशेचा किरण असणारी आहे. आतापर्यंत स्पर्धेत भाग घेऊन कितीतरी गावे पाणीदार झाली आहेत़ यावर्षी महाराष्ट्रातील 4036 गावांमधून ही स्पर्धा होत आहे़  उत्तर सोलापूर तालुक्यातील  34 गावांचा यात समावेश आहे़ या धर्तीवर कोंडी येथे स्पर्धेच्या सुरुवातीलाच महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आलेले होते़ यासाठी   सहभागी होणार्‍या नागरिकांसाठी 10 एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. या बसेस जुना पुना नाका संभाजीराजे चौक येथून सकाळी 7 वाजता निघाल्या.

श्रमदानामध्ये पुढील संस्था सहभागी झाल्या होत्या- भारत सेवा संस्था, नेचर सर्कल, जयहिंद फूड बँक, जिजाऊ ब्रिगेड सोलापूर शहर, जिजाऊ ब्रिगेड सोलापूर, जिजाऊ ब्रिगेड अक्कलकोट शहर आणि तालुका, मराठा सेवा संघ, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, जगदंब जिजाऊ प्रतिष्ठान(मुले आणि मुली दोन्ही ग्रुप), इको फ्रेंडली ग्रुप, इको नेचर ग्रुप, मराठा रणरागिणी ग्रुप, मूकबधिर विद्यालय, बार्शी, भारतरत्न इंदिरा गांधी इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी, श्री सिद्धेश्‍वर हायस्कूल, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संघटना, पर्यावरणप्रेमी ग्रुप, पर्यावरण सखी ग्रुप, संगमेश्‍वर कॉलेजमधील विद्यार्थी, नान्नज-कारंबा-मंडप येथील रहिवासी,  पत्रकार मित्रमंडळी, पत्रकार, आकाशवाणी रेडिओचे मित्रमंडळी, पोलिस अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, हिंदवी परिवार, हेल्पलाईन ग्रुप आदी ग्रुप, संघटना, संस्था. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नव्हता. मात्र दुसर्‍या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर व सांगोला तालुक्यातील 78 गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला होता. पाणी फौंडेशनच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानाला गती प्राप्त झाली. या अभियानामुळे दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख संपुष्टात येऊ लागली आहे. जिल्ह्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उत्तम कामगिरी करणार्‍या गावांना पाणी फौंडेशनच्या वतीने पुरस्कारही देण्यात येत आहे.