Thu, Apr 25, 2019 11:31होमपेज › Solapur › पंढरपुरात वीज बिलाची 700 कोटी थकबाकी

पंढरपुरात वीज बिलाची 700 कोटी थकबाकी

Published On: Jan 11 2018 1:09AM | Last Updated: Jan 10 2018 10:14PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

थकीत वीज बिलापोटी वीज वितरण कंपनीने पंढरपूर तालुक्यात वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांतून असंतोष निर्माण झालेला आहे. ही कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी करीत शेतकरी रस्त्यावर उतरत असल्याचे दिसून येत आहे. 

शेतीपंपांची थकीत वीज बिल वसुली मोहीम वीज वितरण कंपनीने हाती घेतली आहे. तालुक्यात शेतीपंपांची सुमारे 700 कोटी रूपयांची थकबाकी असून ही वसुली करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यातच वीज बिले भरा अन्यथा डी.पी. उतरवून ठेवू, असा इशारा वीज वितरण कंपनीने दिला होता. त्यानंतर दोन वेळा मुदतवाढ देत या इशार्‍याची प्रत्यक्षात अंमलबजावणी टाळलेली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने कृषी संजीवनी योजना जाहीर करून शेतकर्‍यांना सुलभ हप्ते पाडून वीज बिल भरण्याची सवलत दिली होती. मात्र त्या योजनेलाही शेतकर्‍यांकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. तालुक्यात जेमतेम 9 कोटी रुपयांची वीज बिल वसुली झालेली आहे. त्यामुळे अखेरीस वीज वितरण कंपनीने तालुक्यात वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातच ही कारवाई सुरू असून पंढरपूर तालुक्यातही आजअखेर 100 पेक्षा जास्त डी.पी. उतरवून ठेवले आहेत. त्यामुळे 10 हजारांपेक्षा जास्त शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केलेला आहे. 

तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात पिके घेतली आहेत. उसाची लागवड वाढलेली असून जानेवारी महिना सुरू झाल्यानंतर पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. त्यातच उजनी कालव्याचे आवर्तन अद्यापही सुटलेले नाही. त्यामुळे विहीर, बोअरवेल्सवरच पिके जगवली जात आहेत. असे असतानाही शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर शेतातील उभी पिके अडचणीत येऊ लागली आहेत. वीज वितरणच्या या कारवाईविरोधात शेतकर्‍यांतून असंतोष निर्माण झाला असून शेतकरी रस्त्यावर उतरू लागले आहेत. 
 दरम्यान, या कारवाईबाबत शेतकरी संघटनाही गप्प असून लोकप्रतिनिधींसह राजकीय नेत्यांनीही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. 

100 डी.पी. सोडवून 10 हजार कनेक्शन तोडले
वीज बिल वसुलीसाठी कारवाई सुरू आहे. पंढरपूर तालुक्यातच 700 कोटी रूपयांची थकबाकी असून कृषी संजीवनी योजनेंतर्गत केवळ 8 ते 9 कोटी रूपयांची वसुली झालेली आहे. त्यामुळे सुमारे 100 डी.पी. सोडवून 10 हजारांवर शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. 
- संदीप सानप, कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी पंढरपूर

अन्यथा राष्ट्रवादी आंदोलन करणार
3 वर्षे दुष्काळ होता. त्यात 8 ते 10 तास वीजपुरवठा करून 24  तासांची वीज बिल वसुली केली जात आहे. वाढीव एच.पी.ची बिले चुकीच्या पद्धतीने दिली आहेत. त्यामुळे ही वीज बिले देणे लागत नसून कंपनीने संपूर्ण वीज बिल माफ करावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन उभे करेल.
- अ‍ॅड. दीपक पवार, अध्यक्ष, पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस