होमपेज › Solapur › पंढरपूरच्या विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियात संशयास्पद मृत्यू

पंढरपूरच्या विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियात संशयास्पद मृत्यू

Published On: Apr 21 2018 10:38PM | Last Updated: Apr 21 2018 10:30PMपंढरपूर : प्रतिनिधी

ऑस्ट्रेलियात अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणासाठी गेलेल्या पंढरपूर मधील ओमप्रकाश महादेव ठाकरे (वय 22) या विद्यार्थ्याचा शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मेलबोर्न येथे मृत्यू झाला. मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अध्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र, ही घटना समजताच पंढरपूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

येथील भारतीय जीवन महामंडळात विकास अधिकारी असलेल्या महादेव ठाकरे यांचा ओमप्रकाश हा एकुलता एक मुलगा आहे. पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी  तो ऑस्ट्रेलियामधील स्विनबर्न विद्यापीठात याच वर्षी गेला होता. मात्र, शनिवारी (दि.21) पहाटे त्यांच्या कुटुबियांना ओमप्रकाशचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र मृत्यूचे नेमके कारण त्यांच्या अद्याप समजू शकले नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. 

ओमप्रकाश हा ठाकरे कुटूंबातील एकूलता एक आणि अतिशय हुशार मुलगा होता. नुकतेच बहिणीच्या लग्नासाठी ओमप्रकाश पंढरपूरला आला होता.  त्यानंतर आता त्याच्या मृत्यूची बातमीच आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ओमप्रकाशचे पार्थीव भारतात येण्यासाठी दोन दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. ऑस्ट्रेलियात शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या असल्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यास अडचण येत आहे. यासंदर्भात भारतीय परराष्ट्र विभागाशी संपर्क साधून त्यामार्फतही प्रयत्न सुरू असल्याचे ओमप्रकाशच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. ओमप्रकाशच्या पश्‍चात शिक्षिका आई, एल. आय. सी. विकास अधिकारी महादेव ठाकरे, एक विवाहीत बहिण असा परिवार आहे.