Sun, Jul 12, 2020 16:31होमपेज › Solapur › पंढरपुरातील पाणीपुरवठा जॅकवेलची इमारत खचली, पाणीपुरवठा धोक्यात

पंढरपुरातील पाणीपुरवठा जॅकवेलची इमारत खचली, पाणीपुरवठा धोक्यात

Published On: Dec 02 2017 10:30PM | Last Updated: Dec 02 2017 10:18PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

जिथून पंढरपूर शहरातील नागरिकांना पिण्याच्या शुध्द पाण्याचा पुरवठा होतो ती नवीन सुधारीत पाणीपुरवठा योजना जॅकवेलची इमारत खचू लागली आहे. त्यामुळे येथील यंत्रणा बंद पडून पंढरपूर शहरातील पाणीपुरवठा बंद पडण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या इमारतीची पाहणी पाणीपुरवठा सभापती विक्रम शिरसट यांनी नुकतीच केली. येथील सर्व कामे पुन्हा उच्च दर्जाची करुन आवश्यक ती डागडुजीची कामे प्राधिकरणाने करणे आवश्यक आहे. यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करुनही प्राधिकरण विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जर ही कामे त्वरीत केली गेली नाहीत तर प्राधिकरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करु, असा इशारा पंढरपूर न. प. पाणीपुरवठा विभागाचे सभापती विक्रम शिरसट यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.

170 एचपी जॅकवेल येथील पॅनल बोर्ड, पंपहाऊसला खुप मोठा धोका निर्माण झाला आहे. प्राधिकरण (एमजीपी) मार्फत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु येथील इमारतीचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याने ही संपुर्ण यंत्रणा कधीही बंद पडू शकते. याची दुरुस्तीबाबत पंढरपूर नगरपरिषदेच्या प्रशासनाकडून एमजीपीकडे अनेकवेळा पत्रव्यवहार झाला आहे. परंतु प्राधिकरणकडून यासंदर्भात कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. जॅकवेल येथील पॅनलबोर्ड इमारत खचली असून भिंतींनाही तडे गेले आहेत. 

येथील चेंबर व पाईपच्या भिंतीही निकृष्ट दर्जाच्या बांधल्याचे दिसून येते. येथील सर्व कामे पुन्हा उच्च दर्जाची करुन आवश्यक ती डागडुजीची कामे प्राधिकरण (एमजीपी) विभागाने लवकरात लवकर करणे आवश्यक आहे.