होमपेज › Solapur › पंढरीत पाणी टंचाई : नागरिक हैराण

पंढरीत पाणी टंचाई : नागरिक हैराण

Published On: Jun 02 2018 10:31PM | Last Updated: Jun 02 2018 9:12PMपंढरपूर : प्रतिनिधी

एका बाजुला हिंदू धर्मीयांचा पवित्र अधिक महिना तर दुसर्‍या बाजुला मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असतानाही पंढरपूर शहरात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे. नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात तक्रारी घेऊन नागरिक येत आहेत. परंतू त्यांच्या तक्रारीचे निवारणही होत नाही. 

सध्या हिंदू धर्मियांचा अधिक महिना सुरू आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील मठ, मंदिरे, धर्मशाळा आणि नागरिकांची घरेही भाविकांच्या आगमनाने गजबजलेली आहेत. चंद्रभागेत सध्या अतिशय अपुरे पाणी असून त्याच अशुद्ध, अपुर्‍या पाण्यात स्नान करून भाविक पुण्यप्राप्ती करून घेत आहेत. तर दुसर्‍या बाजुला मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिनाही सध्या सुरू आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांच्याही धार्मिक कार्यक्रमास, विधीस मोठ्या प्रमाणात सुरूवात झालेली आहे. 

परंतू गेल्या पंधरा दिवसांपासून पंढरपूर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. हे एक दिवसाड येणारे पाणीही पुरेशा प्रमाणात आणि पुरेशा दाबाने मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे. ज्या नागरिकांना गरज आहे त्यांच्या मागणीनुसार नगरपालिकेने टँकरची सोय केलेली असली तरी टँकरही वेळेवेर मिळत नाही. 

त्यामुळे नदीच्या काठावर असूनही नागरिकांच्या घरात पाण्याचा ठणठणाट असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरळीत व पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, याकरिता अनेक नागरिकांनी नगरपालिकेत आणि पाणी पुरवठा विभागात खेटे घातले आहेत. तसेच नगरसेवक, पदाधिकार्‍यांकडेही गार्‍हानी मांडली. मात्र त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटू शकलेला नाही. त्यामुळे आजही संतप्त झालेले नागरिक आपल्या तक्रारी घेऊन नगरपालिकेत येर-झार्‍या घालीत आहेत. 

भीमा नदीला उजनीतून पाणी सोडले असले तरी ते अद्यापही पंढरपुरात पोहोचलेले नाही त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या बंधार्‍यात अत्यल्प पाणी असून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाऊ लागला आहे. पावसाळ्याला सुरूवात झालेली असतानाही शहरात पिण्याच्या पाण्याची बोंब निर्माण झाल्यामुळे शहरातील नागरिक हवालदील झालेले आहेत.