Mon, Aug 19, 2019 17:31होमपेज › Solapur › पाणी, पथदिव्यांची वीज खंडित

पाणी, पथदिव्यांची वीज खंडित

Published On: Feb 13 2018 1:58AM | Last Updated: Feb 12 2018 9:55PMपंढरपूर : प्रतिनिधी

तालुक्यात ग्रामपंचायत व पाणीपुरवठा योजनांकडे 4 कोटी 36 लाख 92 हजार रुपयांची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर स्ट्रीट लाईटची थकबाकी 34 कोटी 34 लाख रुपये  असून वेळोवेळी आवाहन करूनही थकबाकी भरण्यात येत नसल्याने रविवार (दि. 11) पासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाच्या वतीने तालुक्यातील कृषी पंप, पाणीपुरवठा योजना, उद्योग व्यवसाय, स्ट्रीट लाईट व घरगुती वापरासाठी वीज पुरवठा केला जात आहे. कृषी पंपासाठी आठ तास वीजपुरवठा असल्यामुळे शेतकर्‍यांनी कमी वेळेत अधिक शेती पिंकांना पाणीपुरवठा व्हावा म्हणून एकापेक्षा जास्त वीज कनेक्शन घेतली आहेत. मात्र, कृषी पंपासाठी आलेले वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने तालुक्यात सुमारे तीनशे कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. या पार्श्‍वभूमीवर वीज वितरण कंपनीने वीज बिल भरा, अन्यथा कनेक्शन बंद करण्याची भूमिका घेतली आहे.

ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणार्‍या संस्थांकडेही वीज बिल थकले आहे. ग्रामीण विभाग  एक मध्ये 93 तर भाग दोन मध्ये 89 पाणीपुरवठा योजना आहेत. या दोन्ही योजनांकडे मिळून 4  कोटी 36 लाख 92 हजार रुपये थकबाकी असल्याने रविवार ( दि. 11 पासून) या योजनांचा वीजपुरवठा स्ट्रीट लाईट प्रादेशिक संचालक पुणे, बारामती, सोलापूर यांच्या आदेशान्वये खंडित करण्यात आला आहे. तर ग्रामपंचायतींच्या वतीने गावात करण्यात आलेला स्ट्रीट लाईट पुरवठादेखील बंद करण्यात आला आहे. 

पंढरपूर तालुक्यात स्ट्रीट लाईटची भाग एक मध्ये 306 तर भाग दोन मध्ये 172 कनेक्शन्स आहेत. यातील 395 स्ट्रीट लाईट कनेक्शन्स बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे रविवारपासून अनेक गावांत रात्रीच्यावेळी अंधार दिसून येत आहे. तर उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असताना पाणीपुरवठा योजनांची वीज बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.