Thu, Jul 18, 2019 16:31होमपेज › Solapur › सद‍्गदित अंत:करणाने भाविकांनी घेतला निरोप

सद‍्गदित अंत:करणाने भाविकांनी घेतला निरोप

Published On: Jul 24 2018 11:28PM | Last Updated: Jul 24 2018 11:27PMपंढरपूर : प्रतिनिधी

15 ते 20 दिवस सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर होऊन पंढरीत आलेल्या भाविकांनी चंद्रभागेत स्नान, विठ्ठलाचे दर्शन घेऊन तृप्त भावनेने आणि सासूरवाशिनींच्या सद‍्गदित अंत:करणाने आपल्या माहेराचा निरोप घेतला. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा, असे म्हणून गावाकडे परत जाण्यासाठी भाविकांनी एस.टी. बसस्थानक, रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी केली होती. तसेच द्वादशीच्या दिवशीच सर्व वाहने शहराबाहेर पडत असताना वाहतुकीची कोंडी टाळण्यात भाविकांना यश आले आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरीत लाखो भाविकांनी गर्दी केली होती. एकादशीच्या दिवशी प्रमुख रस्त्यांवर खूप मोठी गर्दी झाली होती. दुसर्‍याच दिवशी रस्त्यांवरील गर्दी निम्म्यापेक्षा कमी झाली. भाविकांनी परतीसाठी खासगी वाहने, एसटी बस, रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी केली होती. पंढरपूरच्या यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाने 72 गाड्यांची, तर एसटी महामंडळाने 3800 बसेसची सोय केल्याने आलेल्या प्रवाशांची मोठी सोय झाली. पंढरपूर बस स्थानकाने या वारीला चार बस स्थानकांचे सोय केल्याने शहराच्या चारही दिशांना भाविकांची गर्दी दिसून आली. चंद्रभागा बस स्थानकातून मुंबई, पुणे, सातारा तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बस स्थानकातून अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक या गाड्या जात होत्या आणि तीन रस्ता येथील बस स्थानकातून मराठवाडा, नागपूर, धुळे कडे जात होत्या. नव्याने सुरू झाले सांगोला रोड येथील आयटीआय कॉलेज येथून सिंधूदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूरला जात होत्या. 

आषाढी वारीला दिंड्यांबरोबर पायी चालत येणार वारकरी आणि भाविकांची संख्या जास्त असते. जास्तीत जास्त भाविक परतीच्यावेळी एसटी बस अथवा रेल्वेला प्राधान्य देत असतो. वारीसाठी आलेल्या भाविकांपैकी 60 ते 70 टक्के भाविक एसटी बस व रेल्वेने प्रवास करत असतात. परतीच्या प्रवासात विठ्ठलाचे मुख दर्शन, कळस दर्शन किंवा पायावर माथा टेकून झालेल्या दर्शनाने अनेक भक्‍तांच्या चेहर्‍यावर उत्साह दिसत होता. सणा-सुदीला माहेरी आलेली सासूरवासीन माहेरच्या माणसांचा निरोप घेते त्याच भावनेने वारकरी पंढरीचा निरोप घेताना दिसत होते.