Thu, Apr 25, 2019 13:29होमपेज › Solapur › खुल्या जागेत अवैध धंदे : रस्त्यावर अतिक्रमणे

खुल्या जागेत अवैध धंदे : रस्त्यावर अतिक्रमणे

Published On: Feb 27 2018 8:21AM | Last Updated: Feb 26 2018 8:40PM
पंढरपूर :  प्रतिनिधी

नगरपालिकेच्या खूल्या जागा, वाहन तळ अतिक्रमणाने व्यापले आहेत. त्या जागांतून अवैध धंदे चालत आहेत तर रस्त्यावर भाजी विक्रेत्यांसह अतिक्रमणांची गर्दी झाल्यामुळे पंढरपूर शहरात जागो-जागी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिकच हैराण आहेत, असे नाही तर वाहतूक शाखेचे कर्मचारीही हतबल झालेले दिसून येत आहेत. पंढरपूर नगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक नेमके काय करते अशी विचारणा केली जात आहे. 

पंढरपूर शहरातील वाहतुकीची कोंडी दर दिवशी अधिक प्रमाणात वाढत जात असल्याचे दिसते. शहरात येणार्‍या सर्वच रस्त्यावर तसेच शहरातील रस्त्यांवरही दोन्ही बाजुंनी व्यापारी, दुकानदारांची अतिक्रमणे आहेत. फूटपाथ पथारी आणि फेरीवाल्यांनी ताब्यात घेतलेले आहेत.  

वाहनांच्या पार्कींगसाठीच्या वाहनतळाच्या जागा एक तर मोकळ्या पडलेल्या आहेत किंवा त्यांवरही अतिक्रमणे झालेली आहेत. पालिकेच्या ज्या जागा खुल्या आहेत त्या मोक्याच्या जागांवर जुगार, मटका, दारू विक्रीसारख्या अवैध व्यवसायिकांनी बळकावल्या आहेत. काही मोकळ्या जागांमध्ये मूर्तीकारांनी कब्जा केलेला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दर दिवशी दोन्ही बाजूंनी अतिक्रमण वाढत आहे. 

विशेष म्हणजे अधिकृतपणे अनामत रक्कम देऊन, दर महिन्यांला भाडे, वार्षिक कर भरणार्‍या मालमत्ताधारक आणि दुकान गाळे धारकांना जप्तीच्या नोटिसा बजावणारी नगरपालिका या अतिक्रमण धारकांपुढे मात्र सप्शेल लोटांगण घालत असल्याचे दिसून येते. खुल्या जागेत राज-रोसपणे खोकी आणि टपर्‍या टाकून अतिक्रमणे करणार्‍यांविरोधात पालिका कसलीही कारवाई करीत नाही. त्यामुळे हे अतिक्रमण दरदिवशी वाढत असताना दिसते. 

पंढरपूर नगरपालिकेने अतिक्रमण हटवण्याकरिता विशेष पथक नेमलेले आहे. मात्र हे पथक वारीच्या काळात चार फेरीवाले, पथारीवाले यांचे साहित्य उचलले की आपली जबाबदारी संपल्याच्या भावनेने काम करीत आहे. 

त्यामुळे उघडपणे दिसणार्‍या या अतिक्रमणाकडे डोळेझाक केली जात आहे. शहरातील अतिक्रमणे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत की ती अतिक्रमणे काढली तर सध्या आहेत ते सर्व रस्ते मोकळे होतील आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही. मात्र नगरपालिका या अतिक्रमणांकहे अर्थपूर्ण डोळेझाक करीत असून खुल्या जागेत अवैध धंदे आणि रस्त्यावर वाहतूकीची कोंडी असे ओंगळवाणे असे चित्र निर्माण झाले आहे.