Wed, May 22, 2019 16:17होमपेज › Solapur › पंढरपूर तालुका शिक्षण विभाग साडी विक्रीच्या कामात

पंढरपूर तालुका शिक्षण विभाग साडी विक्रीच्या कामात

Published On: Jan 29 2018 11:25PM | Last Updated: Jan 29 2018 9:53PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर तालुका शिक्षण विभागातील वरिष्ठांनी गरज नसतानाही गणवेश म्हणून सक्‍तीने हलक्या प्रतीच्या साड्या महिला शिक्षकांच्या पदरात टाकल्या आहेत. या माध्यमातून  संबंधितांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक कमाई केल्याचाही आरोप होत  आहे.

पंढरपूर तालुक्यातील महिला शिक्षकांकरिता एक गठ्ठा सुमारे 1 हजार साड्यांची खरेदी वरिष्ठ पातळीवरून करण्यात आलेली आहे. तसेच या साड्या गणवेश म्हणून वापरण्याच्या सूचना महिला शिक्षकांना केल्या जात आहेत. या साड्यांची किंमत दुकानामध्ये 300 ते 350 रुपयांपेक्षा जास्त नाही. मात्र हलक्या प्रतीच्या या साड्या 650 रुपयांना एक याप्रमाणे विकण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठ पातळीवरूनच या साड्यांची खरेदी झालेली असून केंद्रप्रमुखांना साडी विक्रेत्यांप्रमाणे कामाला जुंपलेले आहे. केंद्रप्रमुखांनी आपापल्या भाग शाळांमध्ये जाऊन सर्व महिला शिक्षकांना या साड्या खरेदी करण्याची सक्‍ती केली आहे. बहुतांश शिक्षिकांनी साड्यांची गुणवत्ता पाहून आणि यांची गरज नसल्यामुळे साड्या खरेदी करण्यास नकार दिला होता. मात्र तरीही साड्या नाही घेतल्या तर याचे पैसे आम्हाला भरावे लागतील असे सांगून केंद्रप्रमुखांनी या साड्या शिक्षकांना विकून टाकल्या आहेत. 
या साड्या विक्रीला शिक्षकांतून विरोध होऊ लागल्यानंतर सुमारे 2 महिने हे प्रकरण शांत झाले होते. मात्र त्यानंतर पुन्हा मागील आठ-दहा दिवसांपासून या साड्या विकण्याचा उद्योग केंद्रप्रमुखांनी सुरू केलेला आहे. सुमारे 1 हजार साड्या खरेदी करण्यात आलेल्या आहेत. वास्तविक जि. प. शाळांना गणवेश सक्‍ती नाही मात्र तरीही गणवेश म्हणून या साड्यांची विक्री शिक्षिकांना केली जात आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठांच्या दबावात येऊन शिक्षकांना नाईलाज म्हणून या साड्या घेण्याची तयारी दर्शवली आहे. 

जवळपास 70 टक्क्यांपेक्षा जास्त साड्यांची विक्री करण्यात आली असून अजूनही बहुतेक शिक्षिकांनी या साड्या घेण्यास नकार दिलेला आहे. तरीही साड्यांची विक्री जोमात सुरू आहे. गटशिक्षणाधिकार्‍यांच्या कार्यालयातूनही थेट केंद्रप्रमुखांना, शिक्षिकांना साड्या घेण्याविषयी फोन केले जात आहेत. त्यामुळे नाराजीच्या सुरातच शिक्षिका या साड्या ठेवून घेत असल्याचे दिसून येत आहे.