Fri, Mar 22, 2019 02:01
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › ऊस तोडणी-वाहतूक मजूर आणायचे कोठून?

ऊस तोडणी-वाहतूक मजूर आणायचे कोठून?

Published On: Jul 03 2018 10:52PM | Last Updated: Jul 03 2018 10:04PMपंढरपूर : प्रतिनिधी

धुळे, नंदूरबार जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी समजून स्थानिकांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये मंगळवेढा तालुक्यातील 5 जणांचा बळी गेल्यानंतर तसेच पंढरपूरचे माजी नगरसेवक नंदकुमार डोंबे यांच्यावर प्राणघातक हल्ला जमावाने केल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील उस वाहतूक, तोडणी ठेकेदार भयभीत झालेले आहेत. विशेष  म्हणजे याच अफवेमुळे मराठवाड्यातही अनोळखी माणसांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्यामुळे त्या भागात उस तोडणी मजुराच्या शोधात जावे की नको या विवंचनेत तोडणी, वाहतूक ठेकेदार सापडले आहे. 

राईनपाडा ( ता. साक्री, जि.धुळे ) येथे मंगळवेढा तालुक्यातून गेलेल्या डवरी गोसावी समाजातील 5 लोकांची अमानुषपणे ठेचून हत्या करण्यात आली. मुले पळवणारी टोळी समजून या पाच जणांना ठार करण्यात आले. तत्पूर्वी पंढरपूरचे माजी नगरसेवक नंदकुमार डोंबे हे म्हसावद ( ता. शहादा जि.नंदूरबार ) येथे मजुराच्या शोधासाठी गेले असता तेथेही त्यांना दोनशे पेक्षा जास्त लोकांच्या जमावाने प्रचंड मारहाण केली तसेच त्यांची इनोव्हा कार जाळून टाकली. 

दोन दिवसांच्या अंतराने या दोन गंभीर घटना घडल्यामुळे मंगळवेढा तालुक्यासह पंढरपूर तालुक्यातही चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या पंढरपूर तालुक्यात आगामी ऊस गाळप हंगामाचे नियोजन सूरू असून साखर कारखान्यांसोबत ऊस तोडणी, वाहतूक करार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ऊस तोडणीसाठी अवश्यक मजूर मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातून करार करून आणले जातात. त्यानिमित्ताने आतापासूनच पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील तोडणी वाहतूक ठेकेदारांचे मराठवाड्यात दौरे सुरू झालेले आहेत. 

मात्र धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील भयानक घटनांमुळे मजुरांच्या शोधात मराठवाड्यात जाणे धोकादायक मानले जाऊ लागले आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांत मराठवाड्याच्या अनेक भागात मुले चोर समजून अनोळखी व्यक्तींना बेदम मारहाण करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर मजुराच्या शोधार्थ मराठवाड्यात जावे की नको याविवंचनेत तोडणी वाहतूक ठेकेदार सापडलेले आहेत. सुरक्षिततेची काळजी घेऊन जावे तरीही यापूर्वी व्यवहारातून दुखावलेले अनेक लोक या निमित्ताने मागील रागाचा वचपा काढतील अशीही भीती व्यक्त होत आहे. 

यापूर्वी अनेक कामगारांनी करार मोडलेले आहेत, तोडणी वाहतुकीपोटी उचललेले पैसे थकवलेले आहेत. त्या पैशाच्या वसुलीपोटी येथील ठेकेदारांचे त्या लोकांसोबत वाद झालेले आहेत. त्यामुळे या निमित्ताने मागील वादाचा  रागअफवेच्या आडून काढला जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे मराठवाड्यात ऊस तोडणी वाहतूक करार करण्यासाठी जावं की नको या विवंचनेत पंढरपूर तालुक्यातील ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार सापडल्याचे दिसून येत आहेत.