Wed, Mar 20, 2019 12:44होमपेज › Solapur › गुंडांच्या कुंडल्या तयार करीत आहोत

गुंडांच्या कुंडल्या तयार करीत आहोत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

शहरात 2008 नंतर उभा राहिलेल्या गुंडांच्या 5 ते 6 टोळ्या आहेत. त्या सर्व गुंडांच्या कुंडल्या तयार करण्याचे काम सुरू आहे. या सर्व गुंडांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस काम सुरू आहे. अवैध धंदे, वाळू तस्करी, खासगी सावकारीला आळा घालू. स्ट्राँग केसपेपर तयार करून मोक्काअंतर्गत कारवाई करू, कोणताही गुंड नाही तर आम्ही पोलिस ताकदवान आहोत, सक्षम आहोत हे दाखवून देऊ. पंढरपूरला नव्या दमाचे,  पोलिस अधिकारी देऊ आणि गँगवॉर पुन्हा उभा राहणार नाही यासाठी पावले उचलली जातील अशी ग्वाही कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिली. 

येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात पंढरपूरचे प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी,  राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,  लोकप्रतिनिधींसोबत रविवारी नांगरे-पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी आ. भारत भालके, जिल्हा पोलिस प्रमूख एस. वीरेश प्रभू, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख मिलिंद मोहिते, सहायक पोलिस अधीक्षक निखील पिंगळे आदी उपस्थित होते. 

 नांगरे -पाटील पुढे म्हणाले की, पंढरपूरच्या गुंडगिरीचा इतिहास आम्ही काढला आहे. या शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती आणि गुन्ह्यांचा अभ्यास केला असता यामागे मुजोर झालेले खाजगी सावकार आणि अवैध धंदे, वाळू चोरीच्या माध्यमातून अफाट माया गोळा केलेल्या प्रवृत्ती असल्याचे आढळून येत आहे. गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत माजवायची आणि त्यानंतर अवैध धंदे करून प्रचंड मालमत्ता गोळा करायची असे प्रकार येथे घडत आहेत. अवैध सावकारी, अवैध धंद्यातून ज्या गुन्हेगारांना प्रचंड माया गोळा केली आहे. त्यांच्याविरोधातील तक्रारी अर्ज काढले आहेत. अशांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली जाईल. 

संदीप पवार, माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांच्या खून प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल आणि मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. या खून प्रकरणात केस पेपर्स अधिक सक्षम करण्याचे काम सुरू आहे. निष्क्रीय अधिकारी हटवून पंढरपूरला नव्या दमाचे, सक्षम पोलिस अधिकारी देणार आहोत. पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणे 1 मे रोजी सुरू होत आहे. पंढरपूर शहर हे कडक आणि संवेदनशील पोलीस ठाणे केले जाईल. 1 महिन्यात चांगले परिणाम दिसून येतील आणि पंढरपूर शहर पोलिस ठाणे राज्यात आदर्श पोलिस ठाणे म्हणून गणले जाईल अशा प्रकारे कारवाई केल्याचे दिसून येईल असाही विश्‍वास यावेळी नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला. 

यावेळी आ. भारत भालके यांनी शहरातील डॉनचा बंदोबस्त करा असे आवाहन नांगरे-पाटील यांना केले. चांगले, सक्षम पोलिस अधिकारी शहरात नेमून द्या, त्यांना काम करण्यासाठी मोकळीक द्या, असे आवाहन करतानाच पोलिसांच्या कामातील राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कायद्याचा धाक राहिला पाहिजे अशीही अपेक्षा व्यक्त केली. शहर आणि तालुक्यातील चोर्‍या, घरफोड्या, दारू, मटका, वाळू तस्करी, खासगी सावकारी बंद झाली पाहिजे. सी.सी.टी.व्ही. शासनाने बसवावेत, शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे त्याकरिता वाहतूक शाखा सक्षम करावी अशीही मागणी आ. भालके यांनी केली. 

यावेळी  नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर, पंचायत समिती सदस्य  प्रशांत  देशमुख, श्रीकांत शिंदे, पं.स.सदस्या मुबिना मुलाणी, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा आशा बागल यांनीही शहर आणि तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आपले प्रश्‍न मांडले.  जिल्हा पोलिस अधीक्षक एस.वीरेश प्रभू यांनी उपस्थितांचे आभार मानले. 


  •