Thu, Mar 21, 2019 15:56होमपेज › Solapur › पंढरपूर येथील शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणास प्रारंभ

पंढरपूर येथील शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणास प्रारंभ

Published On: Mar 08 2018 11:01PM | Last Updated: Mar 08 2018 8:59PMपंढरपूर : प्रतिनिधी

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात यावे. अशी मागणी नागरिकांतून होत होती. मात्र नगरपरिषदेकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते. दै.‘पुढारी’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्याने अखेर नगरपालिकेने छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे.

दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरपूर शहरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या चौकातूनच भाविक दर्शनाकरिता मंदिराकडे जातात. त्याचबरोबर शिवतीर्थ येथे अनेक राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे शिवतीर्थ व शिवाजी चौकाची पंढरीच्या इतिहासात वेगळी ओळख आहे. परंतु येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याच्या सुशोभिकरणाकडे नगरपालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शिवभक्‍तांकडून नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी शिवभक्‍तांकडून अनेक वेळा करण्यात आली. मात्र नगरपालिकेने आश्‍वासन देण्याव्यतिरिक्‍त काही केले नाही. म्हणून नगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत शिंदे यांनी सुशोभिकरणाचा मुद्दा सातत्याने नगरपालिका सभागृहात उपस्थित केला.  

त्याचबरोबर दै.‘पुढारी’ने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाबाबत वृत्त प्रसिद्ध केल्याने या वृत्ताची दखल घेत अखेर नगरपालिकेने छत्रपतींच्या अश्‍वारुढ पुतळ्याचे शोभिकरणाच्या कामास दि. 6 मार्चपासून  सुरुवात केली आहे.यात पाषाण दगडाचा बुरुज बांधणे, तोफा ठेवण्याची व्यवस्था करणे, रंगकाम, आकर्षक विद्युतरोषणाई करणे व सरकत्या जिण्याची शिडी उभारणे आदी कामे करण्यात येणार आहेत.