Wed, Nov 14, 2018 06:24होमपेज › Solapur › पंढरपूर-सातारा मार्गावरील हजारो झाडांची कत्तल

पंढरपूर-सातारा मार्गावरील हजारो झाडांची कत्तल

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 8:17PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर-सातारा या राज्य मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत असून या रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरत असलेली जुनी शेकडो झाडे कापून काढली जात आहेत. अनेक दशके सावली देणारी आणि वाटचाल सुखकर करणारी झाडे कापली जात असल्याचे पाहून या मार्गावरून ये-जा करणारे प्रवासी, स्थानिक नागरिक हळहळ व्यक्‍त करीत आहेत.

पंढरपूर-सातारा मार्ग सध्या दोन पदरी असून त्याचे चौपदरीकरण तसेच सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील म्हसवड ते पंढरपूर तालुक्यातील उपरीपर्यंत रस्त्याचे काम वेगात सुरू झाले आहे. या कामासाठी कोणत्याही प्रकारचे भुसंपादन अथवा नागरिकांच्या मालमत्तांचे नुकसान झालेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुर्वीच्याच ताबा रेषेच्या आत हे रुंदीकरण केले जात आहे. मात्र या रुंदीकरणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली शेकडो झाडे निर्दयीपणे कापून काढली जात आहेत. कापणी यंत्राच्या सह्यायाने गेल्या 60 ते 70 वर्षांपासून रस्त्याच्या दुतर्फा असलेली पिंपर, लिंब, चिंच अशी चांगली सावली देणारी झाडे कापून काढली जात आहेत. ज्या झाडांच्या सावलीत अनेक दशके प्रवास केला ती झाडे कापून जमीनदोस्त केली जात असल्याचे पाहून या मार्गाने नेहमी प्रवास करणारे प्रवासी, स्थानिक नागरिक हळहळ व्यक्‍त करीत आहेत.  पंढरपूर-सातारा मार्गाच्या दोन्ही बाजूंनी विशेषत: पंढरपूर तालुक्यातील भाळवणी, उपरी, सुपली, वाखरी या गावांच्या हद्दीत अतिशय दाट संख्येत झाडे उभा होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बरोबरीने स्थानिक शेतकर्‍यांनी, नागरिकांनी ही झाडे जतन केली होती. त्यामुळे या झाडांसोबत स्थानिकांनाही जिव्हाळा जडला होता. त्यांच्या डोळ्या देखत झाडांच्या खांडोळ्या केल्या जात असल्याचे पाहून नागरिकांतून हळहळ व्यक्‍त होत आहे. रस्त्याचे रुंदीकरण होईल, विकास अधिक गतीने साध्य होईल मात्र निसर्गाचे संवर्धन केलेली तीन-चार पिढ्यांना सावली दिलेली ही झाडे पुन्हा उभा राहण्यासाठी चार-दोन पिढ्या जातील असेही बोलले जात आहे.