Tue, Apr 23, 2019 00:16होमपेज › Solapur › संदीप पवार हत्येप्रकरणी गोपाळ सरजीला अटक 

संदीप पवार हत्येप्रकरणी गोपाळ सरजीला अटक 

Published On: Apr 18 2018 10:26PM | Last Updated: Apr 18 2018 10:21PMपंढरपूर : प्रतिनिधी

 अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येप्रकरणी भारतीय जनता पक्षाचा गोपाळपूर जिल्हा परिषद गटाचा सदस्य गोपाळ अंकुशराव ऊर्फ सरजी याला पंढरपूर न्यायालयाने 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित अद्यापही फरार आहेत. त्यांच्यापर्यंत पोलिस कधी पोहोचतात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांची 18 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी भरदुपारी स्टेशन रोडवरील  हॉटेल श्रीराम येथे गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या केली होती. या हत्याप्रकरणी गेल्या एक महिन्यात पोलिसांनी 13 जणांना अटक केली असून मंगळवारी सायंकाळी गोपाळपूर जि.प. गटाचा भाजपचा जि.प. सदस्य गोपाळ अंकुशराव यास कोल्हापूरच्या कळंबा जेलमधून ताब्यात घेऊन अटक केली आणि रात्रीच पंढरपुरात आणले. त्याची बुधवारी सकाळी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर न्यायाधीश आदरवाड यांनी त्यास 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी अंकुशराव विरोधात भादंवि 302, 120 ब नुसार गुन्हा दाखल केला आहे. गोपाळ अंकुशराव याला संदीप पवार खूनप्रकरणी अटक केल्यानंतर आता या खून प्रकरणातील मुख्य संशयित संदीप अधटराव आणि विकी मोरे, तसेच अन्य एक संशयित विशाल पवार यांचा पोलिस शोध घेत आहेत. संदीप पवार यांच्या खुनानंतर  पंढरपूर शहर आणि तालुक्यात प्रचंड दहशत पसरली होती. नागरिकांचा पोलिसांवरील विश्‍वास उडाला होता. यानंतर सुमारे 8 दिवसांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे  आय. जी. विश्‍वास नांगरे-पाटील यांनी याप्रकरणी पोलिस मुख्य सूत्रधारांपर्यंत लवकरच पोहोचतील आणि पंढरपुराच्या गुन्हेगारी क्षेत्राची पाळेमुळे खोदून काढली जातील, असा विश्‍वास व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी जलद गतीने कारवाई हाती घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर गोपाळ अंकुशराव यास अटक केल्यानंतर संदीप पवार यांच्या हत्येमागे कोण आहे, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.