Sat, Apr 20, 2019 17:51होमपेज › Solapur › संत कान्होपात्रा आजही उपेक्षित : शासन उदासीन

संत कान्होपात्रा आजही उपेक्षित : शासन उदासीन

Published On: Jul 22 2018 11:59PM | Last Updated: Jul 22 2018 11:48PMमंगळवेढा : प्रा. सचिन इंगळे

महाराष्ट्राच्या भूमीला प्रतिभावंत संतांची समृद्ध परंपरा लाभल्यामुळेच इथल्या लोकसंस्कृतीला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, अध्यात्मिक विचारांचा वसा-वारसा मिळाला. यातच एक नाव आहे संत कान्होपात्रा यांचे . मात्र पाचशे वर्षे झाली  तरी आजही या संत कवियत्रीच्या चांगल्या स्मारकाबाबत शासन दरबारी प्रश्‍न मांडावा लागतो ही शोकांतिका आहे.  शासनाने संत ज्ञानेश्‍वर (आळंदी), संत एकनाथ (पैठण), संत सावता माळी (अरण), संत तुकाराम (देहू), या संताच्या स्मारकासाठी जागा देऊन चांगली स्मारके उभी केली आहेत मात्र याच संत परंपरेत असणार्‍या या स्त्री संत कान्होपात्रेच्या स्मारकाबाबत शासनाला कधी जाग येणार असा संतप्त सवाल भाविकांमधून विचारला जात आहे 

13  व्या शतकात तत्कालीन परिस्थितीत झगडत संवेदनशील कान्होपात्रा ऐन तारुण्यात भक्‍तिरसात बुडून पांडुरंगचरणी सर्वस्व अर्पण करते व आईच्या पारंपरिक देहविक्रयाच्या व्यवसायाला नकार देते. कान्होपात्रेने निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावर विसंबून आपला जीवनक्रम ठरवला. तिने विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी देवासमोर हात जोडून उभी राहिली. देवापासून दूर जाण्याची कल्पना तिच्यासाठी असह्य  होऊन विठ्ठलाच्या पायाशी तिने देह ठेवला. कान्होपात्रेच्या अपूर्व भक्‍तीने अखेर तिला सर्वातून मुक्‍ती मिळाली. विठ्ठलाचे पाय न सोडता त्याच्या चरणी सहज देहत्याग घडावा हे पराकोटीच्या भक्‍तीखेरीज अशक्य होतं. कुणी गुरू नाही, काही परंपरा नाही सभोवताली, घरात, परिसरात भक्‍तीचं वातावरण नाही. अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्‍तीने तिने ईश्‍वरप्राप्ती करून घेतली, म्हणून कान्होपात्रा अद्वितीय ठरते. तिच्या भक्‍तीमुळे समाजही तिच्या पायाशी नतमस्तक झाला आणि तिला संतपद मिळाल. मात्र  मंगळवेढा येथे एका कुटुंबाच्या पडवीमध्ये कान्होपात्रा यांची दीड 

फूट उंचीची मूर्ती होती. पाच वर्षांपूर्वी रखुमाईसारखी कमरेवर हात ठेवलेली नवीन दोन फूट उंचीची मूर्ती बसविण्यात आली आहे. मंदिर जे आहे ते दुर्लक्षित आहे. यावर शासनाने समिती स्थापन करून  संत कान्होपात्रेच्या मंदिर आणि स्मारकासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.

 सुसंस्कृत महाराष्ट्र कधी जागा होणार?

 कान्होपात्रेच्या तेजस्वी विचार व ओजस्वी भक्तिभावाचे अस्तित्व जपून आहे. आपल्या जगण्याला भाव नितळ-निर्मळ ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारी कान्होपात्रा तिच्या जीवनचरित्रातून आणि निवडक 23 अभंगांतून समाजापुढे संवेदनशील प्रश्‍न उपस्थित करत राहते.  कान्होपात्रेच्या राहत्या जागेवर अतिक्रमण झालेले असून त्यावर बांधकाम चालू आहे व तिच्या स्मारकासाठी गावात कुठेच जागा मिळत नसल्यामुळे, लोकांची इच्छा असूनही त्यांना काहीच करता येत नाही. यावर सुसंस्कृत महाराष्ट्र कधी जागा होणार आहे असा प्रश्‍न वारकरी मंडळी करीत आहेत.