Mon, Apr 22, 2019 12:32होमपेज › Solapur › पंढरीत रस्त्याचे काम कासवगतीने

पंढरीत रस्त्याचे काम कासवगतीने

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:21PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेले पंढरपूर अर्बन बँक ते अंबाबाई पटांगण रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे या भागातील संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून जागोजागी वाहतूक कोंडी होऊन वाहनधारक, नागरिकही त्रस्त झालेले आहेत. 

पंढरपूर शहरातील सर्वात अरूंद आणि मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या अर्बन बँक ते अंबाबाई पटांगण या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून सुरू झालेले आहे. काम सुरू होऊन सुमारे 4 माहिन्यांचा कालावधी होत आला असला तरी अद्यापही 25 टक्केसुद्धा काम पूर्ण झालेले नाही. 

सुरूवातीला 18 मीटर्स रूंद असलेला हा सिमेंट काँक्रिटचा रस्ता नगरपालिकेने ठराव करून 15 मीटर्स करण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी यात्रेपूर्वी रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली होती. अंबाबाई पटांगण बसथांबा येथे रस्ता खोदून ठेवला. परंतु पाण्याची पाईपलाईन, लोकांचे नळजोड स्थलांतरण, ड्रेनेज पाईपलाईन दुरूस्ती या कामांमुळे काम रखडले. त्यानंतर पुन्हा वाळूअभावी रस्त्याचे काम सुमारे 2 महिने रखडले होते. शेवटी महसूल विभागाने जप्त केलेली वाळू लिलावात विकत घेऊन हे काम कसेबसे सुरू झालेले आहे. जेमतेम 500 मीटर्स लांबीचा हा रस्ता 4 महिन्यात पूर्ण होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला होता. मात्र चार महिने झाल्यानंतर 25 टक्केसुद्धा काम पूर्ण झालेले नाही. केवळ रस्त्याची 100 मीटर्स खोदाई झालेली असून निम्म्या रस्त्यामध्ये मुरूम करण्यात आलेला आहे. बाजूने गटार करण्याचे काम आता सुरू असून संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण कधी पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांतून विचारण्यात येत आहे. 

रस्त्याचे काम तातडीने व्हावे याकरिता पालिका प्रशासन सतत दबाव टाकत आहे. परंतु काम कासवगतीने का सुरू आहे याचा उलगडा होत नाही. रस्ता रूंदीकरणामुळे बाधित होणार्‍या नागरिकांना पालिकेने मोठी रक्कम नुकसान भरपाई पोटी दिलेली आहे. मात्र  मालमत्ताधारकांनी नियमानुसार आपली बांधकामे अजूनही मागे घेतलेली नाहीत, असेही काही ठिकाणी दिसून येते. 

काही ठिकाणी लोकांनी जुनी बांधकामे पाडून पुन्हा काही मीटर्सचे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालवला असल्याचेही दिसते. त्यावरून  एकंदरीत या रस्त्याच्या कामाचा दर्जा, निविदेनुसार त्याची पूर्तता संशोधनाचा विषय होऊन बसलेला आहे. शहरातील रस्त्यांची ज्या पद्धतीने वाट लागली आहे त्यामुळे आर्थिक बोजा पडत आहे.