Wed, Jan 16, 2019 23:46होमपेज › Solapur › प्रताप गंगेकर टोळी एक वर्षाकरिता हद्दपार

प्रताप गंगेकर टोळी एक वर्षाकरिता हद्दपार

Published On: Apr 19 2018 9:57PM | Last Updated: Apr 19 2018 9:52PMपंढरपूर : प्रतिनिधी

 पंढरपूर शहरातील गुन्हेगारी वर्तुळात कायम चर्चेत असलेल्या  माजी नगरसेवक प्रताप नारायण गंगेकर याच्यासह 10 सदस्य असलेल्या टोळीला सोलापूर जिल्हा व जत, आटपाडी तालुक्यांतून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. यासंदर्भात  5 जणांना नोटीस बजावून 48 तासांत पंढरपूर सोडून जाण्यास सांगितले आहे. उर्वरित 5 जण सध्या हद्दपार आहेत. त्यांची मुदत संपून ते पंढरपुरात आल्यानंतर त्यांनाही नोटीस देऊन हद्दपार करण्यात येणार आहे. 

शहर पोलिस ठाण्याअंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. शहरात शांतता रहावी, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस विभागाकडून गंभीर गुन्हे असलेल्या  गुन्हेगारांना काही दिवसांकरीता तडीपार करण्यात येते. राष्ट्रपुरुषांच्या जयंती प्रसंगी गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांकडून समाजात तंटे होऊ नयेत म्हणून  शहर व तालूका पोलीस ठाण्याअंतर्गत मागील आठवड्यात  53 जणांना 10 दिवसांकरीता जिल्ह्यातील हद्दपार करण्यात आले आहे.  तर दि.17 रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 प्रमाणे माजी नगरसेवक प्रताप नारायण गंगेकर ( टोळी प्रमुख) तर टोळीचे सदस्य शब्बीर करीम पटेल ( रा. भोसले चौक) भाऊसाहेब धोंडीबा गावडे ( रा. दाते मंगल कार्यालयाजवळ)  दिनेश अनंतलाल परदेशी (रा.कैकाडी महाराज मठाजवळ ) श्रीपाद वासुदेव पेठकर ( रा. रेणुका मंदीराजवळ )  शांताराम शंकर अधटराव ( रा. झेंडे गल्ली ) रमेश रंगलाल खबाणी ( रा. कालिकादेवी चौक) चंदुलाल रतन परदेशी ( रा. टाकळी रोड ) सुरेश अनंतराव मोरे ( रा. भक्ती मार्ग )  दत्तात्रय लक्ष्मण पवार ( रा.एकलासपूर हल्ली रा. झेंडे गल्ली )  पंढरपूर या दहा जणांना एक वर्षाकरीता सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा,मोहोळ, द.सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, माळशिरस तसेच सांगली जिल्ह्यातील जत व आटपाडी तालूक्यातून हद्दपारीचे आदेश देण्यात आले आहे. पोलीसांच्या या कारवाईमुळे पंढरपूर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.