Tue, Jul 16, 2019 09:49होमपेज › Solapur › प्रभाकर देशमुख यांच्यावर खंडणीचा गुन्हा; एक दिवसाची पोलिस कोठडी

प्रभाकर देशमुख यांच्यावर खंडणीचा गुन्हा; एक दिवसाची पोलिस कोठडी

Published On: Mar 08 2018 11:00PM | Last Updated: Mar 08 2018 9:40PMपंढरपूर : प्रतिनिधी

जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर ऊर्फ भैय्या देशमुख व अन्य तिघांना एका प्रकरणात आरोपीस जेलमधून सोडण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात 72 लाख रुपये खंडणीची मागणी करत धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभाकर (भैय्या) देशमुख, सचिन कारंडे, अनिल झुंजार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी महिलेचा पती तुकाराम कोळी हा सध्या तुरुंगामध्ये आहे. त्यास जेलमधून सोडवितो, तुम्ही घाबरू नका. सर्व केसेस संपवितो म्हणून प्रभाकर भैय्या देशमुख (रा. पाटकूल, ता. मोहोळ), सचिन कारंडे व अनिल झुंजार दोघे (रा. पंढरपूर) व अन्य अनोळखी 

एक या चौघांनी  72 लाख रुपयांची खंडणीची मागणी 25 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वा. फिर्यादीकडे केली. खंडणी न दिल्यास तुमचे जगणे मुश्किल करु, इतरांकडून तुमचा घातपात करु, अशी धमकी दिली आहे. 

फिर्यादी व फिर्यादीच्या पतीला वेगवेगळ्या गुन्ह्यांत अडकवून जन्मठेपेची शिक्षा लावीन, तुझी नोकरी घालवून टाकीन, नवरा- बायकोला आयुष्यभर खडी फोडायला पाठविण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद या महिलेने शहर पोलिसांत  8 रोजी  दिली असून पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी प्रभाकर (भैय्या) देशमुख, सचिन कारंडे, अनिल झुंजार यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सपोनि शाम बुवा करीत आहेत.