Wed, May 22, 2019 16:16होमपेज › Solapur › पवार खूनप्रकरणी दोन सुपारी किलरना अटक

पवार खूनप्रकरणी दोन सुपारी किलरना अटक

Published On: May 03 2018 10:50PM | Last Updated: May 03 2018 10:47PMपंढरपूर : प्रतिनिधी

 येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने बुधवारी आणखी दोन संशयित आरोपींना अटक केली. गुरुवारी त्यांना पुणे येथील विशेष मोक्‍का न्यायालयासमोर उभा केले असता न्यायालयाने दोघांनाही 11 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हे दोन्हीही आरोपी अनोळखी म्हणून पोलिसांच्या रडारवर होते त्यांना पकडण्यात आल्यामुळे संदीप पवार खूनप्रकरणी पोलिस मुळापर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हे दोन्ही आरोपी सराईत सुपारी किलर असल्याचे सांगितले जाते .

18 मार्च रोजी नगरसेवक संदीप पवार यांची पंढरपूर येथे गोळ्या घालून आणि सत्तूरने वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करून आजवर 13 आरोपींना अटक केली असून अद्यापही दोन प्रमुख संशयित पसार आहेत. या खून प्रकरणात पोलिसांनी भाजपचा जि.प. सदस्य गोपाळ अंकुशराव यालाही अटक केली असून या संपूर्ण गुन्ह्याला मोक्‍का कलम लावण्यात आलेले आहे. या प्रकरणी यापूर्वी 14 आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य अनोळखी 4 ते 5 लोकांचा पोलिस शोध घेत होते. त्यापैकी 2 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून बुधवारी दिगंबर जानराव (रा. लऊळ, ता. माढा ) आणि पिराची लिगाडे (रा. बिबवेवाडी, पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी या दोघांनाही पुणे येथील विशेष मोक्‍का न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांची 11 मेपर्यंत  पोलिस कोठडीत रवानगी केली. 

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी सुपारी किलर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या खून प्रकरणात सराईत मारेकर्‍यांचा वापर करण्यात आला असल्याचे दिसून येते. या खून प्रकरणाला मोक्‍का कायद्याअंतर्गत कलम लावण्यात आले असून 19 आरोपींवर मोक्‍काअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. अजूनही प्रमुख संशयित विकी मोरे, संदीप अधटरावसह 2 ते 3 अनोळखी आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.