Tue, Mar 26, 2019 23:54होमपेज › Solapur › पंढरपूर : २०१७ फक्त परिचारकांचेच

पंढरपूर : २०१७ फक्त परिचारकांचेच

Published On: Dec 26 2017 1:35AM | Last Updated: Dec 25 2017 10:32PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

 2017 या सरत्या वर्षात पंढरपूर तालुक्यात  आ. परिचारक गटाने झालेल्या सर्वच निवडणुकांत आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले, तर विठ्ठल परिवाराची पराभवामुळे मोठी राजकीय पिछेहाट झाल्याचे दिसून आले. 

2017 हे वर्ष पंढरपूर तालुक्यातील राजकारणाच्यादृष्टीने मोठ्या स्थित्यंतराचे ठरले आहे. 2016 च्या अखेरीस झालेल्या नगरपालिका निवडणुकीत  मोठा विजय मिळवल्यानंतर फेब्रुवारीअखेर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही आ. परिचारक यांच्या गटाने दणदणीत विजय मिळवला. 8 पैकी 7 जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या 16 पैकी 12 जागा जिंकून परिचारक गटाने आपले निर्विवाद वर्चस्व  असल्याचे दाखवले होते. विठ्ठल परिवाराच्या बालेकिल्ल्यात जाऊन परिचारक गटाने विजयाचा झेंडा रोवला आहे. तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी दिनकर नाईकनवरे, तर उपसभापतिपदी अरूण घोलप यांची निवड केली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आ. प्रशांत परिचारक हे किंगमेकर ठरले आहेत. त्यांचे बंधू उमेश परिचारक यांनीही पडद्यामागून सूत्रे हलवून जिल्हा परिषदेतही सत्तांतर घडवण्यात मोठे योगदान दिले. त्यामुळे सरत्या वर्षात संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आ. परिचारक गटाचा दबदबा निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान पटकावल्यामुळे आ. प्रशांत परिचारक यांनी पंढरपूरच्या विकासकामांना गती दिलेली आहे.

जिल्हा परिषद निवडणूक प्रचारादरम्यान आ. परिचारक यांच्या तोंडून सैनिक पत्नींविषयी चुकीचे वक्तव्य अनावधानाने गेले. याची त्यांना  मोठी राजकीय किंमत मोजावी लागली असून दीड वर्षांसाठी विधानपरिषद सदस्यत्व निलंबित झाले आहे.  अन्यथा आ. परिचारकांना राज्यमंत्रिमंडळात मंत्रीपदाची संधी हमखास  मिळाली असती ती सध्या तरी दुरावलेली आहे. हा अपवाद वगळता आ. प्रशांत परिचारक आणि उमेश परिचारक यांनी पंढरपूर, मंगळवेढा विधानसभा मतदारसंघच नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आपला दबदबा निर्माण केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांपाठोपाठ झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही आ. परिचारक गटाने 7  ग्रामपंचायती आणि सरपंचपदे पटकावून आपले वर्चस्व कायम राखले आहे. याशिवाय वर्षभरात झालेल्या विकास सोसायट्यांच्या निवडणुकांतही परिचारक गटाचेच वर्चस्व राहिले असून पांडुरंग सहकारी साखर कारखाना, पंढरपूर अर्बन बँक, नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती अशा संस्था ताब्यात आल्यामुळे परिचारक गटाचे पंढरपूर तालुक्यात पुन्हा वर्चस्व निर्माण झाले आहे. तुलनेने विरोधी विठ्ठल परिवारास जिल्हा परिषद निवडणुकीत 5 जागा गमावाव्या लागल्या. आ. भालके यांचे पुत्र भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांचे बंधू समाधान काळे यांचे पराभव विठ्ठल परिवाराच्या जिव्हारी लागले आहेत. त्यातून सावरत असतानाही ग्रामपंचायत निवडणुकीत अपेक्षेनुसार यश मिळालेले नाही. 

आ. भारत भालके यांनी सध्या फक्त तालुक्यातील विकासकामे,  विठ्ठल सहकारीचा गाळप हंगाम पार पाडण्याकडेच लक्ष दिले आहे.