Wed, Apr 24, 2019 21:30होमपेज › Solapur › पालखी महामार्गाच्या सर्वेक्षणात चुका

पालखी महामार्गाच्या सर्वेक्षणात चुका

Published On: Feb 13 2018 1:58AM | Last Updated: Feb 12 2018 9:15PMपंढरपूर : नवनाथ पोरे

मोहोळ-पंढरपूर-पुणे या पालखी महामार्गाचे काम सुरू होत असून त्याकरिता भूसंपादन प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र या भूसंपादनाचा सर्व्हे करताना चुकीच्या पद्धतीने केला जात असून राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रकाशित केलेल्या संभाव्य बाधित क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र संपादन केले जात असल्याचे दिसत आहे. जाहीर क्षेत्रापेक्षा प्रत्यक्ष ताबारेषा जास्त क्षेत्रावर दाखवल्यामुळे शेतकरी संतप्त होऊ लागले आहेत. 

पंढरपूर-पुणे या पालखी मार्गाचे पंढरपूर ते तोंडले-बोंडलेपर्यंत 6 पदरीकरण करण्यात येत असून त्याकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे भूसंपादन करण्यात येणार आहे. मात्र या रस्त्याचा आराखडा उपग्रहावरून केला आहे. त्यानुसार संपादित कराव्या लागणार्‍या भूसंपादनाविषयी जाहीर सूचना प्रकाशित करण्यात आलेली आहे. पंढरपूर शहराच्या उत्तर बाजूने या मार्गाला बायपास असून हा बायपास नव्याने शंभर टक्के भूसंपादन करून तयार करण्यात येत आहे. त्यासाठी शेकडो हेक्टर सुपीक जमीन संपादित केली जात आहे. या बायपास मार्गाला अनेक पर्याय उपलब्ध असताना त्यांचा विचार न करता सध्या अस्तित्वात असलेले रस्ते सोडून पूर्णपणे नव्याने रस्ता तयार करण्यात येत आहे. त्यामुळे वाखरी, शिरढोण, कौठाळी, गुरसाळे, आढीव, भटुंबरे, शेगावदुमाला या गावांतील शेतकरी बायपासच्या विरोधात संघटित होऊ लागले आहेत. 

या रस्त्याचा आराखडा सॅटेलाईटवरून केला असून आता प्रत्यक्ष ताबारेषा आखणीकरिता तांत्रिक कर्मचारी दाखल झाले आहेत. त्यांनी रस्त्याची मोजणी करून ताबारेषा खुणा कायम केल्या आहेत. मात्र या खुणा केल्यानंतर बाधित होणारे क्षेत्र आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रकाशित केलेल्या नोटिसीतील संपादन करावे लागणारे क्षेत्र यामध्ये मोठी तफावत आहे. 

सॅटेलाईट सर्वेनुसार कराव्या लागणार्‍या भूसंपादनापेक्षा प्रत्यक्षात बाधित क्षेत्र दुप्पट असल्याचे अनेक शेतकर्‍यांनी आक्षेप घेतले आहेत. या भूसंपादनाविरोधात शेतकर्‍यांनी हरकती नोंदवण्यास सुरूवात केली आहे. मात्र हरकती नोंदवल्यानंतर फार काही बदल होईल, अशी आशा शेतकर्‍यांनाही वाटत नाही. त्यामुळे शेतकरी न्यायालयात जाण्याची तयारी करू लागले आहेत. 

पंढरपूर तालुक्यात या पालखी महामार्गाचे सहापदरीकरण  करण्यात येत आहे. यामध्ये 4 पदरी  काँक्रिटीकरण, तर दोनपदरी पादचार्‍यांसाठी डांबरीकरण करण्यात येत आहे. त्याच्या बाजूला पुन्हा पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारीकरिता जागा सोडण्यात येणार आहे. एकूणच या आराखड्यानुसार अनावश्यकरित्या महामार्गाचे रूंदीकरण करण्यात येत असून प्रस्तावित संभाव्य  भूसंपादनापेक्षा प्रत्यक्षात दुप्पट भूसंपादन केले जात आहे. मग नुकसान भरपाई किती मिळणार याबाबतही शेतकरी अनभिज्ञ आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने यासंदर्भात अधिकृतपणे खुलासा करून नेमके किती क्षेत्र संपादन होणार आहे, नुकसान भरपाई कशा पद्धतीने दिली जाणार आहे यासंदर्भात शेतकर्‍यांना विश्‍वासात घ्यावे तसेच शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळावे, अशीही अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. चुकीच्या पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया राबवली गेली तर विरोध करून ही प्रक्रिया बंद पाडण्यात येईल, असाही इशारा शेतकर्‍यांकडून दिला जात आहे.