Thu, Jun 27, 2019 01:33होमपेज › Solapur › अधिकमासानिमित्त पंढरीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अधिकमासानिमित्त पंढरीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Published On: May 16 2018 10:15PM | Last Updated: May 16 2018 9:43PMपंढरपूर : प्रतिनिधी

अधिकमासानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्याकरिता येणार्‍या भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवण्यावर भर दिला आहे. अधिकमासात भजन, कीर्तन, प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तर मंदिर समितीकडून अधिकमासात विठ्ठल-रुक्मिणीचे ऑनलाईन व व्हिआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. 

पंढरीत अधिकमास दि. 16 मे ते 13 जून या कालावधीत संपन्न होत आहे. अधिकमास सुरू होताच भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनाकरिता गर्दी करू लागले आहेत. चंद्रभागा नदीपात्रात मुबलक पाणी असल्याने भाविकांची स्नानाची सोय झाली आहे.वाढत्या उन्हाचा चटका भाविकांना बसू नये म्हणून मंदिर परिसरात शेडनेट उभारण्यात आलेले आहे तर कासार घाट ते पत्राशेड  पर्यंत दर्शन रांग उभारण्यात आली आहे.  दर्शन रांगेतील भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी वाटप करण्यात येत आहे. याकरिता विश्‍व सामाजिक सेवा संस्था आळंदी हे पाणी वाटप करीत आहेत.  नियमित पोलिस बंदोबस्ता व्यतिरिक्‍त महाराष्ट्र कमांडो फॉर्स नातेपुते येथील कमांडोज बंदोबस्तासाठी घेण्यात आले आहेत. 

मंदिर परिसरात दोन अद्ययावत रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह ठेवण्यात आल्या आहेत. मंदिर, मंदिर परिसर व दर्शन रांगेतही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहेत. मंदिरावर लक्षवेधी डकोरेशन करण्यात आले आहे. मंदिरातील बाजीराव पडसाळी येथील धोकादायक स्लॅब काढलेल्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. भाविकांकडून देण्यात येणार्‍या देणगीची पावती देण्यासाठी कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत.देणगी जमा करण्याकरता जादा स्टॉल उभारण्यात आले आहेत. 

या व्यतिरिक्‍त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन डोनेशन व्यवस्था उपलब्ध आहे. अधिकमात पंढरीत येऊ न शकणार्‍या भाविकांना लाईव्ह दर्शन संकेत स्थळावर उपलब्ध असून टाटा स्काय डिश टिव्ही व विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेतील भाविकांची मोजदाद करण्यासाठी डिव्होटी काउंटिंग मशीन बसविण्यात आली असल्याने अधिकमासात दर्शन घेण्यात आलेल्या भाविकांची संख्या निश्‍चित होणार आहे. 

मंदीर समितीकडून बुंदीचे लाडू व राजगिरा लाडू उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अधिक मास व्यवस्थतीत रित्या पार पाडण्यासाठी मंदिर समिती व प्रशासनाच्यावतीने चोख प्रयत्न करण्यात येत आहेत.