होमपेज › Solapur › जुन्या रस्त्याचीही भरपाई द्या

जुन्या रस्त्याचीही भरपाई द्या

Published On: Apr 06 2018 10:07PM | Last Updated: Apr 06 2018 9:35PMपंढरपूर : प्रतिनिधी

मोहोळ-पंढरपूर-आळंदी या पालखी महामार्गासाठी भूसंपादन करीत असताना मूळ रस्त्याचीही नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सर्वच शेतकर्‍यांकडून करण्यात येऊ लागली आहे. त्याचबरोबर आपल्या शेतामधील बाधित होणारे कायमस्वरूपी जलस्त्रोत, परवानगी घेऊन बांधलेली घरे, एकाच बाजूने वळवण्यात आलेला महामार्ग, नोटिफिकेशनमध्ये चुकलेले सात- बारा उतार्‍याचे क्रमांक, सामायिक उतार्‍यावरील भूसंपादनाची भरपाई यासारख्या अनेक प्रश्‍नांचा भडीमार शेतकर्‍यांकडून सुनावणीदरम्यान केला जाऊ लागला आहे. 

मोहोळ-पंढरपूर-आळंदी या पालखी महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार असून त्यासंदर्भात भूसंपादन प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासाठी 3 ए चे नोटिफिकेशन झालेले असून शेतकर्‍यांच्या जमिनीत प्रस्तावित महामार्गासाठीच्या खुणा निश्‍चित केलेल्या आहेत. बाधित शेतकरी आणि मालमत्ताधारकांकडून हरकती मागवण्यात आलेल्या आहेत. या हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया सुरू झालेली असून 4 एप्रिल रोजी 16 गावांतील, तर 5 एप्रील रोजी भंडीशेगाव, वाखरी आणि तुंगत या 3 गावांतील लोकांच्या हरकतींवरील सुनावणी इन कॅमेरा घेण्यात आली. 6 एप्रिल रोजी उर्वरित गावातील बाधित लोकांच्या सुनावणीची प्रक्रिया होत आहे. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी, गाव कामगार तलाठी, भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 
दरम्यान, पहिल्या दोन्ही दिवसांत शेतकर्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केलेल्या रस्त्याचेच त्यावेळी भूसंपादन झालेले नाही. त्याची आम्हाला कोणत्याही प्रकारची भरपाई मिळालेली नाही, आमच्या सात-बारा उतार्‍यावरील हे क्षेत्र कमी झालेले नाही तसेच त्यासाठी आम्ही दरवर्षी रोजगार हमी, शिक्षण कर भरलेला आहे. त्यामुळे मूळ रस्त्याची जमीन आमचीच असून त्याच्या भूसंपादनाची नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी लावून धरलेली आहे. 

यासंदर्भात प्रांताधिकारी सचिन ढोले यांनीही शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सार्व. बांधकाम विभागाकडे या रस्त्याची कागदपत्रे मागितली आहेत. त्यामध्ये काय आहे हे पाहिले जाईल तसेच मूळ गावच्या नकाशात जेवढा रस्ता आहे तेवढा रस्ता सोडून बाकीच्या रस्त्याचे संपादन भरपाईसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे मार्गदर्शन मागितले जाईल, असे आश्‍वासन दिले.  त्याचबरोबर नव्याने होणार्‍या संपादित जमिनीचे, बाधित मालमत्तांचे, झाडे, फळझाडे, पाईपलाईन, विहिरी, बोअर या सर्वांचे रितसर पंचनामे केले जातील आणि योग्य तो मोबदला दिला जाईल, असेही आश्‍वासन ढोले यांनी शेतकर्‍यांना दिलेले आहे. 

जुन्या राज्यमार्गाची भूसंपादन प्रक्रिया त्यावेळी पार पडलेली नाही तसेच  त्या रस्त्यामुळे शेतकर्‍यांचे बाधित क्षेत्रही नेमके स्पष्ट होत नसल्यामुळे जुना राज्यमार्ग नेमका किती आहे हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निश्‍चित करावे आणि त्याचीही भूसंपादन भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी लावून धरली आहे.