होमपेज › Solapur › जुन्या पालखीमार्गाचे भूसंपादन नाही

जुन्या पालखीमार्गाचे भूसंपादन नाही

Published On: Mar 19 2018 10:28PM | Last Updated: Mar 19 2018 9:47PMपंढरपूर : प्रतिनिधी

जुना पालखीमार्ग अर्थात पंढरपूर-महाड या मार्गासाठी भूतकाळात कसलेही भूसंपादन झालेले नाही. त्यामुळे प्रस्तावित पालखी महामार्गासाठी संपादित केल्या जाणार्‍या 45  मीटर्स रस्त्यासाठी भूसंपादन मोबदला दिला जावा आणि तो समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर 5 पट असावा, अशी मागणी या महामार्गावरील शेतकर्‍यांकडून होऊ लागली आहे. 
मोहोळ-पंढरपूर-पुणे-आळंदी या मार्गाचे पालखी महामार्ग म्हणून रुंदीकरण करण्यात येत आहे. या महामार्गापैकी जुना पालखीमार्ग म्हणजेच पंढरपूर-महाड या रस्त्याची निर्मिती करताना नियमानुसार भूसंपादन प्रक्रिया पार पाडली गेलेली नाही. तशा प्रकारचे कसलेही रेकॉर्ड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नसल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगितले जाते. विशेष म्हणजे या रस्त्याला त्यावेळी शेतकर्‍यांनीही कसलाच विरोध न केल्यामुळे प्रत्येक रूंदीकरणावेळी हा रस्ता विस्तारत गेला. सध्या या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण केले असले तरी ते हस्तांतरण कोणत्या आधारावर केले हासुद्धा एक प्रश्‍न उपस्थित होत आहे. जुन्या पालखीमार्गाची रूंदी कुठे 30 मीटर्स आहे, तर कुठे 40 मीटर्स आणि काही ठिकाणी हा रस्ता जेमतेम 20 मीटर्स एवढा आहे. या मार्गासाठी गेल्या 50 वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने देखभाल, दुरूस्तीसाठी करोडो रूपयांचा खर्च केला. मात्र कधीही शेतकर्‍यांना रितसर भूसंपादन मोबदला दिला नाही किंवा शेतकर्‍यांनी केलेल्या अतिक्रमणास अटकाव केला नाही. याच मार्गास समांतर अशा पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्गाचे इंग्रज काळात भूसंपादन झाले असून त्याच्या नोंदी शेतकर्‍यांच्या सात-बारा उतार्‍यावर आलेल्या आहेत. मात्र  जुन्या पालखीमार्गालगतच्या एकाही सात-बारा उतार्‍यावर पंढरपूर-महाड या राज्यमार्गाची नोंद नाही. मात्र आजवर या कोणत्याही गोष्टीकडे शेतकर्‍यांनी लक्ष दिले नव्हते. हा मार्ग शासनाचा आहे असे समजून शेतकरी गप्प होते. मात्र प्रस्तावित पालखी महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जुन्या मार्गाच्या संपादनाची बाब शेतकर्‍यांच्या लक्षात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रस्तावित केलेल्या महामार्गासाठी जेवढे भूसंपादन दाखवले आहे त्यापेक्षा कमी-अधिक क्षेत्र बाधित होत आहे. शिवाय जुन्या रस्त्याच्या हद्दी आणि प्रस्तावित भूसंपादन यांचाही ताळमेळ बसत नाही. रस्त्याची हद्द नेमकी किती आहे, हेच निश्‍चित नसल्याने शेतकर्‍यांनी आपल्या शेताच्या हद्दींचा शोध घ्यायचा प्रयत्न केला.  त्यावेळी जुना रस्ताच भूसंपादन प्रक्रियेशिवाय केल्याचे शेतकर्‍यांचे लक्षात आले आहे. त्यामुळे जुन्या रस्त्यासाठी गेलेल्या आपल्या जमिनीचा मोबदला तेव्हा मिळाला नसल्यामुळे प्रस्तावित पालखी महामार्ग हा 100 टक्के शेतकर्‍यांच्या जमिनीतून जात आहे. त्यामुळे जुना पालखीमार्ग गृहित धरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेला आराखडा शेतकर्‍यांना अमान्य आहे. जुन्या रस्त्याची मालकीही शेतकर्‍यांचीच असून त्या मार्गासह केला जाणारा प्रस्तावित पालखी महामार्ग हा मूळ शेतकर्‍यांच्याच शेतातून जात असल्यामुळे रस्त्यासाठी लागणार्‍या जमिनीचे शंभर टक्के भूसंपादन गृहित धरून  शेतकर्‍यांना 45 मीटर्सचे पैसे द्यावेत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. 

यासंदर्भात हरकतींवरील सुनावणीवेळी सर्व शेतकरी आपले म्हणणे मांडणार आहेत. शिवाय शासनाने यासंदर्भात निर्णय नाही घेतल्यास प्रसंगी न्यायालयात जाऊन महामार्गाचे काम बंद पाडण्याचीही तयारी शेतकरी करू लागले आहेत. दरम्यान, पालखी महामार्ग हा सहापदरी असून समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर पालखी महामार्गासाठीही 5 पट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करून त्याकरिता जनआंदोलन उभे करण्याची तयारी शेतकरी करू लागले आहेत. सध्या भूसंपादनाची प्रक्रिया दुसर्‍या टप्प्यात आली असून आता कोणताही अडथळा न आणता प्रशासनाला काम करू द्यावे, नुकसान भरपाईच्यावेळी आपली ताकद दाखवून देऊ, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. 

Tags : pandharpur, old palkhi road, no land acquisition,