Sun, May 19, 2019 14:54
    ब्रेकिंग    



होमपेज › Solapur › नाट्यपरिषदेच्या मंचावर निवडणुकीची तालीम

नाट्यपरिषदेच्या मंचावर निवडणुकीची तालीम

Published On: Feb 27 2018 8:21AM | Last Updated: Feb 26 2018 8:46PM



पंढरपूर :  प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळासाठी येत्या 4 मार्च रोजी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. याकरिता सोलापूर जिल्ह्यातून 6 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. या 6 जागांसाठी 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यासंदर्भात आज, 27 रोजी पंढरपूर येथे नाट्य कलाकार, परिषदेच्या सभासदांची बैठक आयोजित केल्याची माहिती नटराज पॅनेलचे उमेदवार दिलीप कोरके यांनी दिली आहे. 

यासंदर्भात अधिक माहिती देताना दिलीप कोरके म्हणाले की,  अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. येत्या 4 मार्च रोजी यासाठी मतदान होणार असून सोलापूर जिल्ह्यातून नाट्यपरिषद नियामक मंडळावर 6 उमेदवार निवडून दिले जाणार आहेत. त्याकरिता सध्या 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व 6 जागा बिनविरोध करण्यासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न केले. तरीही  अतिरिक्त 3 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्यामुळे ही निवडणूक लागली आहे.  सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 395 मतदार आहेत. जिल्ह्यात 4 केंद्रांवर मतदान होत असून सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला या चार केंद्रांवर मतदान होत आहे. त्यापैकी सोलापूर केंद्रावर 1025, पंढरपूर केंद्रावर 738, मंगळवेढा केंद्रावर 258, तर सांगोला केंद्रावर 253 मतदार आहेत. 4 मार्च रोजी पंढरपूर येथील आय.एम.ए. सभागृहात सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत पंढरपूरसह अकलूज शाखेचे सभासदही मतदार करणार आहेत. सोलापूर केंद्रावरच बार्शी शाखेच्या मतदारांसाठी मतदानाची सोय करण्यात आली आहे.  

नटराज पॅनेलचे  सोलापूर   जिल्ह्यात   6 जागांसाठी जयप्रकाश कुलकर्णी, चेतनसिंह केदार, आनंद खरबस, सोमेश्‍वर घाणेगावकर, यतिराज वाकळे आणि दिलीप कोरके यांच्यासह 6 उमेदवार उभे आहेत. हे सर्व उमेदवार नाट्यपरिषदेच्या  कार्याला वाहून घेतलेले उमेदवार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मागील चार वर्षांत नाट्यपरिषदेच्यावतीने नवीन शाखा, सभासद नोंदणी, पंढरपूरचे नाट्य संमेलन, सोलापूरचे पहिले मराठी बालनाट्य संमेलन घेण्यात आलेले आहे.