पंढरपूर: प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील हुतात्मा स्मारक या पवित्र वास्तुची तळीराम आणि कचर्यामुळे प्रचंड दुरवस्था झाली असून नगरपालिकेने या परिसरातील स्वच्छतेसाठी आणि वाचनालयात गरजू वाचकांना चांगली सोय मिळावी याकरिता प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.
शहरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन महावीरनगर भागात नगरपालिकेने वाचनालय सुरू केले होते. मात्र या 1990 च्या सुमारास जागेमध्ये दूरदर्शन केंद्र सुरू करण्यात आल्याने हे वाचनालय जिजामाता उद्यानाजवळ असलेल्या हुतात्मा स्मारक या ठिकाणी सुरू केले होते. सद्यस्थितीत हे वाचनालय देखभाली व दुरूस्ती अभावी बंद अवस्थेत आहेत .
शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यींना, नागरिकांना शहरात वाचनालय व अभ्यासिकाची गरज असताना पालिका वाचनालय सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलत नाही. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले हुतात्मा वाचनालयाची वास्तू ही सध्या पार्किंग आणि दारू, जुगार खेळणार्या तळीराचा अड्डा झाला आहे. या सार्वजनिक ठिकाणी नगरपालिकेचे पाणी पुरवठा कार्यालय व जिजामाता बालोद्यान येथेच राष्ट्रमाता जिजाऊंचा पुतळा व स्मारकही आहे. मात्र तरीही नगरपालिका अधिकारी वाचनालयाकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसतात. वाचनालयाच्या आवारात हे तळीराम वाइन्स शॉपमधून दारू, उद्याना बाहेर असलेल्या हातगाडे किंवा चायनीज गाड्यावरून दारू पिण्यासाठी लागणारे ग्लास, चकना असे साहित्य घेतात. आणि हे दारूडे वाचनालया बाहेर खुलेआम दारू पिताना दिसतात. पालिका कर्मचारी, अधिकारी, पोलिस कोणीही लक्ष देत नाही . या वाचनालयाकडे पालिकेने लक्ष द्यावे. वाचनालय सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलावीत नागरिकांसाठी पालिकेने वाचनालय व अभ्यासिका सुरू करून नागरिकांना सोय उपलब्ध करून द्यावी तसेच या परिसरात स्वच्छता राखावी अशी मागणी होत आहे.