Sun, Apr 21, 2019 14:29होमपेज › Solapur › सूत्रधारासह ४ संशयितांना ९ दिवस पोलिस कोठडी

सूत्रधारासह ४ संशयितांना ९ दिवस पोलिस कोठडी

Published On: Mar 25 2018 10:34PM | Last Updated: Mar 25 2018 10:28PMपंढरपूर : प्रतिनिधी

नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणातील मुख्य संशयित बबलू ऊर्फ अक्षय सुरवसे याच्यासह ठाणे पोलिस कोठडीत असलेल्या चार संशयितांना पंढरपुरात आणल्यानंतर न्यायालयाने 9 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

रविवार, दि. 18 मार्च रोजी पंढरपुरात अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अक्षय ऊर्फ बबलू सुरवसे, पुंडलिक वनारे, मनोज शिरशीकर, भक्तराज धुमाळ हे चार प्रमुख संशयित आरोपी होते. तर यापैकी विकी मोरे आणि संदीप अधटराव हे आणखी दोन संशयित फरार आहेत.  त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. 

19 मार्च रोजी ठाणे पोलिसांनी अक्षय सुरवसे, पुंडलिक वनारे, मनोज शिरशीकर, भक्तराज धुमाळ या चौघांना ठाणे पोलिसांनी सापळा रचून अटक केली होती. त्यांना 26 मार्च पर्यंच पोलिस कोठडी मिळाली होती. मात्र, पंढरपूर पोलिसांनी या आरोपींना 24 मार्च रोजीच रीतसर ताब्यात घेतले आणि  पंढरपुरात आणले होते. रविवार दि. 25 रोजी या चारही संशयितांना जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर केल्यानंतर त्यांना 2 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

या खूनप्रकरणी यापूर्वी हणूमंत बुराडे, रूपेश सुरवसे, सचिन वाघमारे यांना पंढरपुरातून तर सांगली येथून सोलापूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ओंकार जाधव आणि प्रथमेश लोंढे या दोघांना ताब्यात घेतले आहे. हे पाचही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. 

या प्रकरणी आठ दिवसांत मुख्य संशायितांसह एकूण 9 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सोलापूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठी कामगीरी बजावली असून पंढरपूर, सांगली येथील आरोपींना ताब्यात घेण्यात सोलापूरच्या पथकाचा मोठा सहभाग आहे. तुलनेने पंढरपूर शहर पोलिसांकडून संथ गतीने कारवाई झाल्याची चर्चा आहे.