होमपेज › Solapur › माघी यात्रेत भेसळयुक्‍त पेढे विक्री जोमात

माघी यात्रेत भेसळयुक्‍त पेढे विक्री जोमात

Published On: Jan 29 2018 11:25PM | Last Updated: Jan 29 2018 10:00PMपंढरपूर : प्रतिनिधी

 माघी यात्रेत भागवत एकादशी सोहळ्यास चार लाख भाविकांनी उपस्थिती लावून विठ्ठलाचे दर्शन घेतले. भाविकांसाठी प्रशासनाच्यावतीने अत्यावश्यक सेवासुविधांची उपलब्धता करून देण्यात आली होती. मात्र, अन्न व औषध प्रशासनाकडून पेढे व दुग्धजन्य पदार्थ तपासणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने निकृष्ट दर्जाचे पेढे विक्री सुरू राहिली. कमी किंमतीत विक्री करण्यात येत असल्याने भाविक खरेदी करीत असल्याचे चित्र दिसून येत होते.

माघी यात्रेत आलेल्या भाविकांकडून प्रासादिक साहित्याला जास्त मागणी होत असते. विशेषत: पेढ्यांना अधिक मागणी होत असल्याने यात्रा काळात पेढे विक्री जोमात असते. चांगल्या दर्जाचा पेढा 350 ते 400 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. हा पेढा नियमित दुकानदार व्यापार्‍यांकडून विक्री केला जात आहे. तर यात्रा काळात पेढ्यांची होणारी जास्तीची मागणी लक्षात घेऊन रस्त्यावर त्याचबरोबर प्रदक्षिणा मार्ग व घाटावर पेढे विक्रीदेखील सुरू राहाते. याठिकाणी विनापरवाना तसेच परप्रांतीयांंकडून कमी किंमतीत विक्री करण्यात येते. पेढ्यांच्या दर्जाकडे लक्ष न देता निकृष्ट व भेसळयुक्‍त पेढे तयार करून दोनशे ते अडीचशे रुपये प्रति किलो दराने पेढे विक्री सुरू आहे. महाद्वार घाट, दत्त घाट, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर आदी ठिकाणी हलक्या दर्जाच्या पेढ्यांची विक्री जोमात सुरू आहे.

दरम्यान, यात्रेकरिता अन्न व औषध प्रशासन विभागाची चारजणांचे पथक  तपासणी करण्याचे काम करीत असल्याचे सांगण्यात येते. मात्र उघड्यावर सर्रासपणे पेढे व दुग्धजन्य पदार्थ व अन्नपदार्थ विक्री सुरू असल्याचे ठिकठिकाणी दिसून येते.