Thu, Apr 25, 2019 08:15होमपेज › Solapur › सुस्तेत जलसमाधीचा, माढ्यात आत्मदहनाचा प्रयत्न

सुस्तेत जलसमाधीचा, माढ्यात आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Jul 28 2018 11:00PM | Last Updated: Jul 28 2018 10:08PMपंढरपूर/माढा : प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान सचिन शिंगण या युवकाने भीमा नदीच्या डोहात हात-पाय बांधून घेत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या शिताफीने त्याला बाहेर काढण्यात आले असून, येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. 

दुसरीकडे,  माढा तालुक्यातदेखील आंदोलन चांगलेच पेटले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका आंदोलकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सतर्कतेने त्यास रोखले. तालुक्याभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याने प्रमुख मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे गेल्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असून सचिन शिंगण याने भीमा नदीत जलसमाधी घेणार असल्याचा लेखी इशारा प्रशासनास दिला होता. त्याने हे आंदोलन करू नये म्हणून त्याच्या  हालचालींवर प्रशासन लक्ष ठेवून होते. खबरदारीचा उपाय म्हणून भीमा नदीपात्रात महसूलच्यावतीने यांत्रिक बोटीच्या साहाय्याने नजर ठेवण्यात येत होती. अखेर सचिन शिंगणने शनिवारी सकाळी 11  वाजण्याच्या सुमारास प्रशासनास गुंगारा देऊन भीमा नदीच्या पात्रातील डोहात हात-पाय बांधून मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणा देत उडी मारली. पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने व स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून नदीपात्रातून त्याला बाहेर काढले. सचिनच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तो बेशुद्ध पडला होता. त्याच अवस्थेत खासगी वाहनातून त्याला पंढरपूर येथील शासकीय  रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. सचिन शिंगण याच्या जलसमाधी आंदोलनाची खबर वार्‍यासारखी पसरली असता सुस्ते येथील भीमा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमा झाला होता. सुस्ते परिसरात मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा  पसरला असून दोन दिवसांपासून उपोषण सुरू असताना शिंगण याच्या जलसमाधी आदोलनानंतर सुस्ते येथील शेकडो युवकांनी मुंडण करून शासनाचा तीव्र निषेध केला. संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तालुका पोलिसप्रमुख जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, माढा तालुक्यातही मराठा आरक्षण आंदोलन पेटले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलक तानाजी नरसिंह पाटील यांनी रॉकेल अंगावर ओतून पेटवून  घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले. तांदूळवाडी येथे पंधरा युवकांनी मुंडण करुन सरकारच्या यासंदर्भातील भूमिकेचा निषेध केला. माढा परिसरात केवड, उंदरगाव, दारफळ, उपळाई बुद्रुक, उपळाई खुर्द, रणदिवेवाडी याठिकाणी सकाळी नऊदरम्यान टायर पेटवून देऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सकाळच्या सुमारास ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पडसाळी येथे कुर्डुवाडी ते पंढरपूर राज्यमार्गावर रास्ता रोको केल्याने वाहतूक खोळंबली होती. अनेक शाळांना चक्काजाम आंदोलनामुळे सुटी दिली. एसटी बसेसची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. माढा शहरात शिवाजी चौक, स्टेशन रोड, पोस्ट ऑफिससमोर माढा ते कुर्डुवाडी रस्त्यावर टायर पेटवून देण्यात आले होते. दारफळ फाटा येथे सकाळी सातच्या आधीच टायर पेटवून देऊन रास्ता रोको करण्यात आला. सकाळच्या सुमारास आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

आज लातुरात बैठक

लातूर : जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रविवारी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बार्शी रोड पीव्हीआर थिएटरच्या पाठीमागे असलेल्या राहीचंद्र मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील समन्वयक व मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. सुरू असलेले आंदोलन, मराठा आरक्षण, शैक्षणिक सवलती, मराठा मुलांच्या वसतिगृहाबद्दल सरकारने घेतलेली भूमिका तसेच अन्य मागण्यांबाबत या बैठकीत सविस्तर विचारमंथन होणार आहे. आंदोलनाची पुढील दिशाही ठरविण्यात येणार आहे.