Thu, Apr 25, 2019 23:26होमपेज › Solapur › विधानसभेची लांब लढाई: श्रेयासाठी जुंपली चढाई

विधानसभेची लांब लढाई: श्रेयासाठी जुंपली चढाई

Published On: Feb 16 2018 10:39PM | Last Updated: Feb 16 2018 8:31PMपंढरपूर : नवनाथ पोरे

विधानसभा निवडणूकीची लढाई अद्यापही दिड वर्षे दुर असली तरीही आ. भारत भालके आणि विधानपरिषद सदस्य आ. प्रशांत परिचारक यांनी या निवडणूकीच्यादृष्टीने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. त्यातूनच केलेल्या विकास कामांचे श्रेय मिळवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये चढाओढ जुंपली आहे. 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणूकीला अद्यापही 19 महिन्यांचा कालावधी आहे. तत्पुर्वी लोकसभा निवडणूका होणार आहेत आणि या निवडणूका आता जेमतेम 1 वर्षावर येऊन ठेपलेल्या आहेत. मात्र लोकसभेच्या तुलनेत विधानसभेच्यादृष्टीनेच पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील वातावरण तापू लागल्याचे दिसून येत आहे. आ. भारत भालके यांनी गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीतील अपयश मागे टाकून नव्याने मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. त्यांची तब्येत अलिकडच्या काळात बरी नसली तरीही त्यांनी लोकसंपर्क आणि विकास कामांचा पाठपुरावा सुरू केलेला आहे. त्यांच्या मतदारसंघातील कळीचा मुद्दा असलेल्या 35 गावच्या पाणी प्रश्‍नावर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कानपिचक्या देऊन 1 कोटी रूपयांचा टोकन निधी देण्याचे आदेश दिल्यामुळे आ. भालके यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे.  मतदारसंघातील अतिशय महत्वाच्या प्रश्‍नाची सोडवणूक न्यायालयाच्या निकालाने झाली असून सर्व सामान्य जनतेमधूनही आता या योजनेविषयी आणि तिच्या पुर्ततेविषयी  तसेच आ. भालके यांच्या प्रयत्नाबाबत कोणतीही शंका राहिलेली  नाही. त्यामुळे या योजनेची खिल्ली उडवणार्‍या विरोधकांचीही गेल्या पंधरा दिवसांपासून बोलती बंद झालेली आहे. पंढरपूर शहर आणि तालुक्यात विकास कामांचा आढावा, कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. 

 दुसर्‍या बाजुला विधानपरिषदेतील भाजपचे सहयोगी सदस्य आ. प्रशांत परिचारक यांनीही आपल्या पद्धतीने विकास कामांचा पाठपुरावा सुरू केलेला आहे. प्रशासकीय पातळीवर बैठका घेऊन मतदार संघातील प्रलंबीत प्रश्‍नांना मंजुरी घेणे, निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. पंढरपूर शहर आणि तालुक्यातील विविध कामांना  मंजुरीसाठी आपल्या परिने प्रयत्न चालवले आहेत. नुकतेच पंढरपूर  शहरातील भुमीगत गटार योजनेच्या तिसर्‍या टप्प्यासाठी निधी मिळवला आहे. शहरातील रस्त्यांच्या कामातील अडथळे दुरू करीत तालुक्यातील  रस्त्यांकरिता मुख्यमंत्री सडक योजनेतून निधी मिळवणे, तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रलंबीत कामांसाठी निधी मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 
आ. भालके आणि परिचारक हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी  आहेत. अद्यापही त्यांच्यात  थेटपणे शाब्दीक लढाईला तोंड फुटले नसले तरी एकमेकांना आजमावण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभा निवडणूकीसाठी आ. भालके यांची काँग्रेस आघाडीकडून उमेदवारी निश्‍चीत मानली जाते. परंतू परिचारक कोणत्या पक्षाकडून लढतील, आ. परिचारक विधानसभेला रिंगणात उतरतील की त्यांचे बंधु उमेश परिचारक उतरतील किंवा शेवटची मात्रा म्हणून जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारकांना निवडणूकीच्या मैदानात उतरवले जाते याबाबतची चर्चा सुरू आहे. पक्ष, निवडणूक चिन्ह कोणतेही असले तरी परिचारक आणि भालके यांच्यात पुन्हा एकदा जोरदार लढत होईल असे चित्र आहे. 

त्याअनुषंगाने दोन्ही नेत्यांकडून  निवडणूकीची जय्यत तयारी चालू आहे. केेलेल्या आणि खेचून आणलेल्या विकास कामांचे श्रेय मिळवण्यासाठीची चढाई या दोन्ही आमदारद्वयांमध्ये जुंपलेली आहे. लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक जाहीर झाली  तर अडचण नको म्हणून दोन्ही नेते  लोकसभा नजरेसमोर ठेऊन निवडणूकीच्या  तयारीस लागल्याचे दिसून येत आहे आणि  त्यामुळेच तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.