Sun, Mar 24, 2019 04:11होमपेज › Solapur › पंढरीची वाटचाल प्लास्टिकमुक्‍तीकडे!

पंढरीची वाटचाल प्लास्टिकमुक्‍तीकडे!

Published On: May 16 2018 10:15PM | Last Updated: May 16 2018 9:57PMपंढरपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्याचा चांगला परिणाम तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरात दिसत असून पंढरपूर शहर प्लास्टिकमुक्‍तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. शहरातील प्लास्टिकचा कचरा कमी होत असल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्‍त होत आहे. 

राज्य सरकारने नुकताच प्लास्टिकपासून बनविल्या जाणार्‍या पिशव्या, प्लास्टिक, थर्माकॉलच्या वस्तू ताट, कप्स, प्लेटस्, ग्लास, काटे, वाटी, चमचे, फ्लेक्स, बॅनर्स, तोरण, ध्वज, प्लास्टिक सिटस्, प्लास्टिक वेष्टन इ.च्या उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, विक्री करण्यास राज्यात निर्बंध आहेत.    शहरातील दुकानांमध्ये किराणा वस्तू पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशव्या बंद होऊ लागल्या आहेत. फळे आणि इतर प्रकारच्या वस्तू विक्री करणार्‍या व्यापार्‍यांनीही अपाल्याकडील शिल्लक प्लास्टिक पिशव्यांचा स्टॉक संपवून नव्याने विक्री बंद केली आहे. त्यामुळे दुकानात आलेल्या ग्राहकाने कॅरी बॅग मागितल्यास त्यास स्पष्ट नकार दिला जात आहे. बाजारात कॅरी बॅग मिळणे बंद झाल्यामुळे ग्राहकही आता घरून जाताना कापडी, नायलॉनच्या पिशव्या घेऊन जाऊ लागले आहेत. 

प्लास्टिक बंदीला अनुसरून पंढरपूर नगरपरिषदेने  शहरातील सर्व व्यापार्‍यांना रिक्षाद्वारे तसेच वृतपत्रांमध्ये जाहीर प्रसिद्धीकरण देऊन प्लास्टिक उत्पादन व विक्री करण्यास बंदी घातल्याने कोणीही प्लास्टिक वस्तूंची विक्री व उत्पादन करु नये, असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर प्लास्टिकची विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल व विक्रीसाठी ठेवण्यात आलेले प्लास्टिक, उत्पादन कोणतीही पूर्वसूचना न देता जप्त केले जाईल, अशी सूचना देण्यात आली होती. 

या सूचना व अंमलबजावणीचाही चांगला परिणाम दिसत असून रस्त्यावरील कचर्‍यात प्लास्टिक दुर्मीळ होऊ लागले आहे. घरोघरी येणार्‍या बाजारासोबतही प्लास्टिक पिशव्या, कॅरी बॅग, थर्माकोलच्या वस्तू कमी दिसू लागल्या आहेत. तीर्थक्षेत्र पंढरी स्वच्छ करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली असतानाच प्लास्टिकमुक्‍तीचाही चांगलाच हातभार लागला असून पंढरपूर प्लास्टिकमुक्‍तीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसते.