Fri, Jul 19, 2019 13:28होमपेज › Solapur › २८ दिवसांत पावणे सतरा लाख भाविक विठूमाऊलीच्या दर्शनाने तृप्त

२८ दिवसांत पावणे सतरा लाख भाविक विठूमाऊलीच्या दर्शनाने तृप्त

Published On: Jun 15 2018 10:35PM | Last Updated: Jun 15 2018 8:33PMपंढरपूर : प्रतिनिधी

 नुकत्याच झालेल्या अधिक महिन्यात श्री विठ्ठल-रखुमाईचे पदस्पर्श आणि मुखदर्शन असे दोन प्रकारच्या रांगेतून  28 दिवसांत 16 लाख 70 हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे. त्यापैकी 6 लाख 95 हजार भाविकांना पदस्पर्श दर्शन, तर 9 लाख 75 हजार भाविकांनी मुखदर्शन घेतले आहे. 

दोन्ही भाविकांची एकत्रित संख्या 19 लाख 70 हजार एवढी होत आहे. या एका महिन्यात मंदिर समितीला विविध मार्गांनी तब्बल 2 कोटी 33 लाख रूपयांचे अर्थिक उत्पन्न मिळाले आहे, तर 4 किलो 800 ग्रॅम चांदी, 154 ग्रॅम सोन्याच्या वस्तूही मंदिर समितीला दान स्वरूपात मिळाल्या आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.  दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास हिंदू धर्मात पवित्र मानला जातो आणि या महिन्याभरात भाविक तिर्थक्षेत्री जाऊन देवदर्शन, दान-धर्म करतात. पंढरपूर येथे संपूर्ण अधिक मासात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दररोज सरासरी 1 लाखांवर भाविक पंढरीत येत होते. या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीने दर्शन मंडप, विठ्ठल मंदिर, संत तुकाराम भवन, विविध परिवार देवता, मंदिर परिसर, भक्त निवास या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण महिन्याभरात कोणत्याही स्वरूपाचा गैरप्रकार न होता भाविकांना चांगली सेवा मिळाली. तसेच मंदिर समितीला भरघोस आर्थिक उत्पन्नही मिळाले. यावर्षी श्री विठ्ठलाच्या पायावर 34 लाख 73 हजार रूपये, रुक्मिणीमातेच्या पायावर 9 लाख 63 हजार रूपये देणगी मिळाली. अन्नछत्रासाठी 1 लाख 69 हजार रूपये, पावती स्वरूपातील देणगी 66 लाख 23 हजार 873 रूपये, बुंदीलाडू विक्री 32 लाख, हुंडी जमा 45 लाख रूपये, राजगिरा लाडू विक्री 3 लाख 78 हजार रूपये, फोटो विक्री 62 हजार रूपये, भक्त निवास, वेदान्त, व्हीडीओकॉन निवास देणगी 12 लाख रूपये, नित्यपूजा 4 लाख रूपये, विठ्ठल विधी उपचार  1 लाख 88 हजार रूपये, परिवार देवता 8 लाख 10 हजार रूपये, अन्य स्वरूपात 10 लाख 25 हजार रूपये, चंदन उटी पूजा 2 लाख 40 हजार रूपये अशा माध्यमातून एकूण 2 कोटी 32 लाख 51 हजार 924 रूपयांचे उत्पन्न मंदिर समितीला मिळालेले आहे. तीन वर्षांपूर्वी आलेल्या अधिक मासात 2 कोटी 5 लाख 37 हजार रूपयांचे उत्पन्न आले होते. त्या तुलनेत यंदा 28 लाख 45 हजार रूपये जास्तीचे उत्पन्न मंदिर समितीला मिळाल्याचे दिसून येते.