होमपेज › Solapur › गोडसेंचे उपोषण सुरूच; इंचगावला रास्ता रोको 

गोडसेंचे उपोषण सुरूच; इंचगावला रास्ता रोको 

Published On: Jan 31 2018 10:57PM | Last Updated: Jan 31 2018 8:54PMपंढरपूर : प्रतिनिधी

 विविध नागरी प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने कुरूल जि.प. गटाच्या सदस्या शैला गोडसे यांनी सुरू केलेले उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरूच असून त्यांच्या समर्थनार्थ बुधवारी इंचगाव (ता. मोहोळ) येथे नागरिकांनी रास्ता रोको केला. यामुळे सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील वाहतूक बंद पडली होती. 

शैला गोडसे यांनी सोमवार, 29 जानेवारीपासून इंचगाव येथे  आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसर्‍या दिवशीही प्रशासनाने ठोस आश्‍वासन न दिल्याने तिसर्‍या दिवशीही त्यांनी उपोषण कायम ठेवले आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे कुरूल जि.प.गटातील नागरिकांतून प्रशासकीय अनास्थेबाबत नाराजी व्यक्‍त होत आहे. दोन दिवसांत त्यांना भेटून हजारो नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे तसेच अनेक मान्यवर नेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारीही त्यांना भेटून पाठिंबा दर्शवत आहेत. प्रशासन तसेच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी हे या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत नसल्याचे पाहून गोडसे यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवत बुधवारी इंचगाव ग्रामस्थांनी  रास्ता रोको  केला. मंगळवेढा-सोलापूर मार्गावर सकाळपासून ग्रामस्थांनी ठिय्या मांडला होता. 11 वाजेपर्यंत रास्ता रोको चालू होता. त्यामुळे दोन्ही बाजूंनी होणारी वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी अनेक नागरिकांनी संतप्त भावना व्यक्‍त केल्या. इंचगाव येथे गेल्या 70 वर्षांपासून स्मशानभूमीसाठी जागा नाही, वडदेगाव-नळी, वडदेगाव-आंबेचिंचोली या रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण, बेगमपूर व कुरूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मिळावी, कातेवाडी-कुरूल ते सोहाळे पाटीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, कुरूल जि.प. गटातील सर्व कॅनॉल पट्टीच्या कडेची झाडेझुडुपे काढून रस्ता खुला करावा, कुरूल जि.प. गटातील अनेक साठवण तलाव कॅनॉलच्या पाण्याने भरून घ्यावेत. याशिवाय आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणीपुरवठ्याचे अनेक प्रलंबित प्रश्‍न आहेत. त्याबाबत जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, प्रशासकीय पातळीवर वेळोवेळी निवेदने दिली, पाठपुरावा केला. मात्र आश्‍वासनापलीकडे काहीच मिळत नसल्याने गोडसेंनी उपोषण सुरु केले आहे.